नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील तिसरी पर्वणी पार पडल्यानंतर दिगंबर अनी आखाड्यात परपरेनुसार ध्वज उतरविण्यात आला असून, तिन्ही अनी आखाडे अधिकाराबाबत स्वतंत्र आहेत. त्यामुळे ध्वज उतरविल्याचे कारण पुढे करीत आम्हाला उज्जैनच्या कुंभमेळ्यात कुणीही रोखू शकत नसल्याचे दिगंबर आखाड्याच्या महंतांकडून सांगण्यात आले आहे. ‘देखते हैं उज्जैन कुंभमें हमे कौन रोकेगा’ अशा शब्दात दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. दिगंबर अनी आखाड्याकडून पर्वणी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ध्वज उतविण्यात आला होता. यावर महंत ग्यानदास यांनी दिगंबर आखाड्याला उज्जैन कुंभमेळ्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचे म्हटले होते. मात्र त्यांना आम्ही आखाडा परिषदेचे अध्यक्ष मानत नसल्याने ते काहीही बोलले तरी त्याचा उपयोग काय? असे सांगत दिगंबर अनी आखाड्यांच्या महंतांनी त्यांचा समाचार घेतला आहे. तिसऱ्या स्नानानंतर कुंभमेळा पूर्ण होऊन जातो. त्यानंतर ध्वज उतरविण्याचा निर्णय अनी आखाडे घेतात. त्यासाठी कुणाला विचारण्याची गरज नसते. आखाड्याच्या ध्वजारोहणासाठी तिन्ही अनीचे महंत एकमेकांकडे जातात. त्यानुसार दिगंबर आखाड्याने परंपरांचे पालन करीत ध्वज उतरविला आहे. ज्याच्या मागे १३ आखाड्यांपैकी दोनच आखाडे आहेत, कायदेशीर अध्यक्ष आहेत की नाही याबाबत साशंकता आहे, त्यांच्या बोलण्याला अर्थ काय? अशा शब्दात दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोर शास्त्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आखाडा परिषद अध्यक्षांना अधिकार पत्र दिलेले नाही. दिगंबर आखाड्याने तेही वापस घेतल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. शाहीस्नानापूर्वीच दिगंबर आखाड्याने याबाबत प्रशासनाला पत्र दिले आहे. त्यामुळे अध्यक्षांचा प्रश्नच शिल्लक राहात नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे उज्जैनच्या कुंभमेळ्यात नाशिक कुंभमेळ्यातील वादाची धग जाणवणार आहे. (प्रतिनिधी)
‘देखते हैं उज्जैन कुंभमे हमें कौन रोकेगा’
By admin | Published: September 26, 2015 11:00 PM