शासन दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेत आहे. या उपक्रमास हातभार लावावा असा विचार संस्थेचे सचिव राजेश गडाख यांच्या मनात आला. त्यासाठी नाशिक येथील सिद्धीविनायक नागरी पतसंस्थेचे संचालक सचिन भोसले यांनी सीड बॉल तयार करून ते सामाजिक वनीकरणाच्या जागेत डोंगर टेकड्यांवर टाकावेत अशी संकल्पना मांडली व यातूनच शाळेत २५०० सीडबॉल तयार करण्यात आले. मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक विनायक काकुळते, बापू चतुर, भास्कर गुरूळे, जयश्री सोनजे यांनी विद्यालयातील सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांना सोबत घेत या उपक्रमाचे नियोजन केले. तयार झालेले ५०० सीडबॉल नुकतेच विद्यार्थ्यांनी मोहदरी घाटातील वनोद्यान व सामाजिक वनीकरण विभागातील जागेत टाकण्यात आले. यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने पाच किलो विविध झाडांच्या बीया पुरविल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या घरून चिंच, बाभूळ, कडूलिंब, सीताफळ अशा झाडांच्या बीया आणल्या होत्या. त्या शिक्षकांच्या मदतीने शेण-चिखल यात टाकून सीडबॉल तयार करण्यात आले होते. याप्रसंगी पांडुरंग लोहकरे, सागर भालेराव, जिजा ताडगे, अमोल पवार, वृषाली जाधव, सतिश बनसोडे, सुधाकर कोकाटे, पद्मा गडाख, मंदा नागरे, गणेश सुके, कविता शिंदे, निलेश मुळे, योगेश चव्हाणके, प्रशांत कनोजिया, कल्याणी रहाणे, शिवाजी कांदळकर, संदीप गडाख आदी उपस्थित होते. बापू चतुर यांनी सुत्रसंचालन केले तर जयश्री सोनजे यांनी आभार मानले.
मोहदरी घाटात चिमुकल्यांकडून सीडबॉलचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 6:13 PM