नाशिक : निवडणूक आयोगाच्या कामासाठी कागदोपत्री बीएलओ दाखवून त्यांच्या मानधनाची रक्कम लाटल्याच्या मालेगावच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, विशेष लेखा परीक्षणात प्रथमदर्शनी साडेसात लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने या घोटाळ्यास जबाबदार असलेल्या लिपिकास बडतर्फीची तर नायब तहसीलदारास निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे.दोन महिन्यांपूर्वी सदरचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. मालेगाव बाह्य मतदारसंघाचे मालेगाव तहसीलदार कार्यालयात काम करणाऱ्या अभिजित सोनवणे या लिपिकाने निवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्या बीएलओंसाठी दरवर्षी देण्यात येणाºया मानधनाची रक्कम बीएलओंच्या खात्यात जमा न करता, स्वत:ची पत्नी, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी तसेच काही सरकारी कर्मचाºयांच्या बॅँक खात्यावर वर्ग करून लाखो रुपयांचा गफला केला. निवडणूक आयोगाने अलीकडेच मतदार पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केल्यावर बीएलओंना सदरचे काम सोपविले असता त्यांनी मानधन मिळत नाही, काम कसे करायचे असा प्रश्न उपस्थित केल्यावर चौकशीअंती त्यांना अनेक वर्षांपासून मानधनाची रक्कम मिळालेली नसल्याचे आढळून आले. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे अभिजित सोनवणे याचा मित्र असलेल्या जीवन हिरे या तरुणाच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा झाल्याने त्याने तहसील कार्यालयात तक्रार दिली होती. या सर्व गोष्टींची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने विशेष लेखा परीक्षकांकडून चौकशी सुरू केली होती. गेल्या आठवड्यातच ही चौकशी पूर्ण झाली असून, सोबत मालेगाव तहसीलदारांनीदेखील स्वतंत्र चौकशी करून आपला अहवाल सादर केला आहे. त्यात अभिजित सोनवणे या लिपिकानेच हा सारा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, नायब तहसीलदार निकम यांनी हलगर्जीपणा केल्याचे नमूद केले आहे. चौकशी समितीला उपलब्ध झालेल्या कागदपत्रांवरून प्रारंभी साडेसात लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने अभिजित सोनवणे यास बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी तर नायब तहसीलदार निकम यास निलंबनाची नोटीस पाठवून खुलासा मागविला आहे.पोलीस खात्यातील नातेवाइकांना वाटले पैसेलिपिक सोनवणे याने पोलीस खात्यात असलेले सासरे व शालकाच्या नावावर बीएलओंचे पैसे जमा केले एवढेच नव्हे तर त्याच्या घराशेजारी इस्त्री करणाºया व्यक्तीच्या पत्नीच्या नावे, फर्निचरचे काम केलेल्या कारागिराच्या खात्यावर, मित्राच्या मैत्रिणीच्या नावाबरोबरच महसूल खात्यातील काही कर्मचाºयांनाही पैसे वाटल्याचे निष्पन्न झाले आहे.
बीएलओ मानधन घोटाळ्यावर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:34 AM