नाशिक : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर तब्बल सहा दशकांहून अधिक काळ आपला ठसा कायम ठेवलेल्या एव्हरग्रीन जोडप्यातील दुसरा राजहंसदेखील स्वर्गस्थ झाला. अभिनयाच्या स्वकर्तृत्वामुळे आदराने नाव घेतल्या जाणाऱ्या सीमा देव यांचा २००३ या वर्षी नाशिकच्या पिंपळपारावर झालेल्या एका सोहळ्यात सन्मान करण्यात आला होता. संस्कृती वैभवच्या गदिमा महोत्सवात देव दाम्पत्याला अर्थात सीमा देव आणि रमेश देव यांना प्रख्यात अभिनेत्री सुलोचनादीदींंच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याच्या आठवणींचे स्मरण नाशिककरांना झाले.
नाशिकच्या संस्कृती वैभव संस्थेच्या माध्यमातून दहावा, तर एखाद्या महान व्यक्तीला समर्पित करून सादर केला जाणारा तो पहिलाच महोत्सव होता. हा महोत्सव ‘गीतरामायण’कार गदिमा यांना अर्थात ग. दि. माडगूळकर यांना समर्पित करण्यात आला होता. त्यामुळे त्या सोहळ्यासाठी गदिमा यांचे चिरंजीव श्रीधर माडगूळकर तसेच प्रख्यात संगीतकार यशवंत देव, दिग्दर्शक राजदत्त यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. त्या सोहळ्यात सीमा देव आणि रमेश देव यांना गदिमा यांच्या नावाचा पुरस्कार सुलोचनादीदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी रमेश देव यांना वयोमानामुळे कुसुमाग्रज आणि शिरवाडकर हे दोन की एक असा एक क्षण संभ्रम असल्याचे ते बोलत असतानाच त्यांच्याच जवळ उभ्या असलेल्या पतीचा हात धरून त्यांना दोघे एकच असे तत्काळ सांगून त्यांच्या समयसूचकतेचे दर्शन घडवले होते. तसेच त्यानंतर बोलताना सीमाताईंनी तात्यासाहेब यांच्या काव्यातील काही कविता म्हणून दाखवत रसिकांची दाद मिळवली होती.