नाशिक : शहरात दुचाकीचोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी गुन्हेगारांचा शोध घेत असताना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाला वडाळागावातून गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यास यश आले आहे. त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे.
मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पथक दुचाकी चोरी करणाऱ्यांच्या मागावर असताना पोलीस शिपाई अतुल पाटील यांना चोरीची दुचाकीची विक्री करण्याकरिता वडाळागावत एक संशयास्पद व्यक्ती येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सहायक निरीक्षक सचिन सावंत यांच्या पथकाने वडाळागावात सापळा रचला असता संशयित चोरटा सुशांत ऊर्फ दर्शन बाळू भालेराव (रा.देवळालीगाव) हा तेथे चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आला असता पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातून होंडा दुचाकी (एम.एच१५ सीएक्स५७०६) पोलिसांनी जप्त केली आहे. काही दिवसांपूर्वी ही दुचाकी इंदिरानगर भागातून चोरट्यांनी लांबविली होती. पोलिसांनी सुशांतसह एका अल्पवयीन मुलालादेखील या चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलिसांच्या हवाली केले आहे.