नाशिक - रविजा सिंघल. १९ वर्षांची तरुणी. आर्यनमॅन ही अत्यंत खडतर स्पर्धा तिनं नुकतीच आॅस्ट्रेलियात पूर्ण केली. इतक्या लहान वयात ही स्पर्धा पूर्ण करणारी ही पहिली आशियाई तरुणी आहे. ३.८ किलोमीटर पोहणं, ९० किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर पळणं हे सारं तिनं १६ तास ५ मिनिट ४५ सेकंदात पूर्ण केलं. नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी अलिकडेच आयर्नमॅन होण्याचा बहुमान मिळवला. त्या पाठोपाठ त्यांच्या कन्येने यशाला गवसणी घातली. या यंगेस्ट आयर्नमॅन लेडीशी ही खास बातचित.आयर्नमॅन स्पर्धेत उतरावं असं का वाटलं?- मी राष्टÑीय स्तरावर जलतरणपटू म्हणून विविध स्पर्धेत भाग घेत होतेच. पण एक टप्प्यात असं वाटलं काहीतरी वेगळं करावं, असं काहीतरी जे चॅलेंजिग असेल, जे मला चॅलेजिंग वाटेल. पुढं या आयर्नमॅन स्पर्धेविषयी कळलं. मी जलतरणपटू असले तरी मी कधीच सायकलिंग केलं नव्हतं किंवा कधी मी पळतही नव्हते. मग वाटलं हे करु. तेव्हाच कळलं की, आजवर माझ्या वयाच्या कुठल्याच भारतीय काय आशियाई मुलीनंही हे केलेलं नाही. आता तर आव्हान दुप्पट झालं, मग ठरवलं अवघड तर अवघड पण हे करायचंच!अर्थात सोपा नसेलच हा प्रवास, स्वत:ला कसं ‘तयार’ केलंस?
- सोपा तर नव्हताच. पण माझे वडील (पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल) सोबत होेते. ते स्वत: सराव करत होते. मात्र या स्पर्धेसाठीचं प्रशिक्षणच पूर्ण वेगळं होतं. मला घरुन पाठिंबा होता, उत्तम प्रशिक्षक होते. मात्र हे सारं घडलं ते घडण्याची एक प्रक्रिया होती. हळूहळू ते माझ्यातही मुरायला लागलं की, हे आव्हान आपण पेलतोय. आपण करणार आहोत हे सारं. अर्थात कुठलाही खेळ असो, सुरुवातीला सराव करताना वेदना होतात. शरीर तयार नसतं, आपण का करतोय हे, कशासाठी असंही वाटतं. पण मग मीच स्वत:ला सांगत होते, हे चॅलेंज तू स्वत:साठी निवडलं आहेस. सोडून देण्याचा प्रश्नच नव्हता, खेळाडू कधीच अशी मैदानातून माघार घेत नसतो.
जिंकल्यानंतर..? आपण जिंकलो, केलं आपण पूर्ण केलं स्वप्न हे आता जाणवतं तेव्हा..?- मला ती फिनिश लाइन तिरंगा हातात घेऊनच करायची होती. ते मी केलं.. त्याक्षणी जे मी रडलेय. ते असं आनंदी होऊन रडणं मी पहिल्यांदा अनुभवलं. त्यानंतर माझे बाबा जेव्हा म्हणाले, ‘बेटा अच्छा किया..!’ त्या तीन शब्दांनी मला दिलेला आनंदही मोठा आहे. तेव्हा वाटलं, धिस इज बिग डील!