नाशिक : शेतकरी आत्महत्त्या थांबाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात ३१ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चितगव्हाण येथील साहेबराव करपे- पाटील या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबीयांसह आत्महत्त्या केली. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. राज्यातील नोंद झालेल्या शेतकरी आत्महत्त्येची पहिलीच घटना होती. त्यानंतर दरवर्षी हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याच्या घटना घडल्या. राज्यात आणि केंद्रात अनेक सरकारे बदलली तरी शेतकऱ्यांच्या समस्या आणि आत्महत्त्या काही थांबल्या नाही. जोपर्यंत सरकारचे शेतकऱ्यांसंबंधी आणि शेतीसंबंधीचे धोरण बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या होतच राहील, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी दिला होता. ३१ वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले, अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, विभागीय अध्यक्ष दीपक पगार, जगदीश इनामदार, उपाध्यक्ष साहेबराव मोरे, महानगरप्रमुख नितीन रोठे- पाटील, कार्याध्यक्ष शरद लभडे, नीलेश कुसमोडे, प्रफुल्ल वाघ आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बळीराजासाठी आत्मक्लेश आंदोलन
By admin | Published: March 20, 2017 9:09 PM