नवीन नियम : दंडात्मक कारवाई रोखण्यासाठी तत्परतापाथर्डी फाटा : घंटागाडी सक्षम चालविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन नियमांमुळे घंटागाडी चालकांना ‘सेल्फी’ हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. अशाप्रकारे होणाऱ्या हजेरीमुळे अनेकांचे लक्ष वेधले जात आहे. सिडको विभागासाठी एकूण ३४ घंटागाड्या तैनात असून, त्यांची पार्किंगची व्यवस्था शहराबाहेर खतप्रकल्पाच्या जवळील जकात नाक्यावर करण्यात आली आहे. येथे उभ्या केलेल्या घंटागाड्या सकाळी सहापासूनच नेमून दिलेल्या प्रभागात जाण्यासाठी बाहेर पडू लागतात. गाडीवरचा कर्मचारी आणि चालक यांची मोबाइलवर सेल्फी हजेरी घेऊन ती लगेच मनपाच्या संबंधित विभागाला पाठवली जाते. गाड्या पार्क केलेल्या जागेवर मोबाइलला रेंज मिळत नसल्याने महामार्गालगत सर्व्हिस रोडवर हजेरीला सुरु वात होते. रांगेत उभ्या केलेल्या कर्मचाऱ्यांचा येथील सुपरवायझर फोटो काढून लगेच तो मोबाइलवरून फॉरवर्ड करतात. तेथून चालक गाडी ताब्यात घेतात. या गाड्यांमध्ये डिझेल भरून त्या लगेच प्रभागांमध्ये रवाना केल्या जातात. ही सर्व प्रक्रि या सकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण करावी लागत असल्याचे ठेकेदाराचे पर्यवेक्षक कैलास बोडके यांनी सांगितले. सर्व घंटागाड्यांना जीपीआरएस यंत्रणा बसविलेली असल्याने तिचे लोकेशनही मनपाच्या संबंधित यंत्रणेला तपासता येते. गाडी प्रभागात उशिरा पोहचली तर पाच हजार रुपये आणि गाडी प्रभागात गेलीच नाही (त्या दिवशीची गैरहजेरी) तर आठ हजार रुपये दंड आकारला जात असल्याचे बोडके यांनी सांगितले. कचरा संकलन करून तो खतप्रकल्पात खाली केल्यानंतर तीन वाजेपर्यंत गाड्या पुन्हा त्याच ठिकाणी नोंद करून पार्क केल्या जातात. एखाद्या गल्लीत गाडी जाऊ शकली नाही तरी त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागत असल्याचे चालकांनी सांगितले. ठिकठिकाणी वास्तव्यास असलेले कर्मचारी व चालक यांना सकाळी सहापर्यंत पार्किंगच्या ठिकाणी पोहचताना मोठी धावपळ करावी लागत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
घंटागाडी कर्मचाऱ्यांची ‘सेल्फी’ हजेरी
By admin | Published: April 11, 2017 1:48 AM