नाशिक : सेल्फी म्हटलं की तरुणाईला उत्साह गगणात मावत नसतो. पर्यटनस्थळावरील सेल्फी असो वा घरामधील सेल्फी यांसारख्या सर्वच ठिकाणी तरुणाईचा सेल्फी क्रश सध्या बघायला मिळतो. याचसाठी सेल्फीच्या प्रेमात असलेल्या तरुणाईला मतदानाकडे वळविण्यासाठी ‘वोट कर नाशिककर’ या मोहिमेंतर्गत शहरातील ठराविक महाविद्यालयांमध्ये सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना सेल्फीसाठी जणू नवे ठिकाणच मिळाले आहे.भारत देश लोकशाही पद्धतीचा असून, यामुळे निवडणुकीत मतदान करणे हा देशातील सर्व नागरिकांचा हक्क आहे. मात्र आजही अनेक लोक मतदानाकडे पाठ फिरवतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाच्या वतीने मतदारांना आक र्षित करण्यासाठी ‘वोट कर नाशिककर’ या उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले आहे. याचाच एक भाग म्हणून नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी अनोखी शक्कल लढविली आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा याकरिता शहरातील दहा महाविद्यालयांमध्ये सेल्फी पॉइंटचा फंडा अवलंबण्यात आला आहे. जिल्ह्यात १५ मतदारसंघात १९ ते २९ वयोगटांतील सुमारे १८ लाख मतदार असून, यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पॉइंटचा फंडा साकारण्यात आला आहे. ‘होय, दि. २१ आॅक्टोबर रोजी मी मतदान करून माझा हक्क बजावणार’ या आशयाचे फलक लावून नवमतदारांना आकर्षित करण्याचा नवीन उपाय निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या फलकावर उलट्या अक्षरांत मजकू र लिहिण्यात आला आहे. जेव्हा एखादा या फलकासमोर उभे राहून सेल्फी किंवा फोटो काढतो तेव्हा फोटोमध्ये फलकावरील मजकूर आपल्याला वाचता येतो.
मतदार जनजागृतीसाठी महाविद्यालयांमध्ये ‘सेल्फी पॉइंट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:38 AM