सतीश डोंगरे ।नाशिक : मुक्या जिवांवर उदार होऊन आपला स्वार्थ पूर्ण करणे ही पूर्वापार मानवी प्रवृत्ती राहिली आहे. सध्या असेच काहीसे चित्र नाशिकनगरीत बघावयास मिळत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी महाकाय हत्तिणीला जखमी अवस्थेत भर उन्हाळ्यात डांबरी रस्त्याची तप्त वाट तुडवत दारोदार फिरविले जात आहे. या हत्तिणीच्या शरीरावर जागोजागी जखमा असून, तिच्या वेदनांकडे तथाकथित मालकासह वनविभागही डोळेझाक करीत असल्याने तिला वेदनादायी आयुष्य जगावे लागत आहे.सामान्यत: आवाक्याबाहेरील वस्तू सांभाळताना हत्ती पोसणे असा शब्दप्रयोग केला जातो. मात्र प्रस्तुत प्रकरणात हत्तीच आपल्या कथीत मालकाला पोसत आहे. एवढे करूनही त्या गजलक्ष्मीची शुश्रूषा होत नसेल तर आणि त्यातून या हत्तिणीच्या जीविताला धोका पोहोचल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न प्राणी मित्र करीत आहेत.
म्हसरूळ परिसरातून जाणा-या मार्गालगत एका झोपडीच्या शेजारी ‘लक्ष्मी’ नावाची हत्तीण हमखास नजरेस पडते. ४५ वर्षीय लक्ष्मी याठिकाणी बेवारस स्थितीत बांधलेली असते. या हत्तिणीचा मालक असल्याचे सांगणारी व्यक्ती ही परराज्यातील असून, ती एक भिक्षेकरी आहे. आपल्याला ही हत्तीण दानपात्रात मिळाल्याचे तो सांगतो. मात्र, या हत्तिणीची देखभाल किती केली जात असेल याविषयी शंकाच आहे. सध्या या हत्तिणीच्या म्हणजेच लक्ष्मीच्या शरीरावर जागोजागी जखमा झाल्या असून, त्यावर फुंकर घालण्याचे कष्टही त्याच्याकडून घेतले जात नाही. लक्ष्मीच्या एका डोळ्याला मोतीबिंदू झाला आहे. तिच्या मानेवरती एक भलीमोठी जखम असून, त्याचा संसर्ग तिच्या शरीराच्या इतर भागात होताना दिसत आहे. तसेच कानावर फोड आले असून, शरीराच्या मागच्या भागाला एक मोठी जखम झाली आहे. त्यामुळे तिला बसताना प्रचंड वेदना होत असाव्यात.
तसेच कानावर फोड आले असून, शरीराच्या मागच्या भागाला एक मोठी जखम झाली आहे. त्यामुळे तिला बसताना प्रचंड वेदना होतात.अशाही स्थितीत संबंधित व्यक्ती तिला शहरातील विविध भागांमध्ये पैसे कमावण्यासाठी फिरवतो, तसेच इतर जिल्ह्यांमध्येही सार्वजनिक तथा खासगी कार्यक्रमासाठी तिचे ने-आण करून त्यातून बक्कळ पैसे कमावतो. मात्र तिच्या जखमांवर उपचार करण्यासाठी तो आवश्यक ते प्रयत्न करताना दिसत नाही. उलट लक्ष्मीच्या शरीरावरील जखमा ठळकपणे दिसू नयेत म्हणून जखमांच्या अवतीभोवती त्याने रंगांच्या साह्याने फुलांची चित्रे काढली आहेत.दरम्यान, अॅनिमल वेल्फेअर अॅण्ड अॅँटी हॅरेशमेंट सोसायटी अर्थात ‘आवास’ या संस्थेने लक्ष्मीवर तत्काळ उपचार केले जावेत म्हणून वनविभागाकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु वनविभागाच्या चालढकल कारभारामुळे ‘लक्ष्मी’च्या वेदना कमी होणार काय, याविषयी अजूनही साशंकता आहे.
वनविभागाला न्यायालयाची भीतीलक्ष्मीची तातडीने मुक्तता करून उपचारासाठी योग्य ठिकाणी पाठविले जावे, अशी मागणी आवासकडून केली जात असतानाही वनविभाग कुचराईची भूमिका घेताना दिसत आहे. वनविभागाच्या काही अधिकाºयांनी तर कारवाई करण्याबाबत हात वर करताना, संबंधित व्यक्ती न्यायालयात गेल्यास आमची नोकरी धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली.