आगामी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंगबाजीला उधाण येते. संक्रांतीला पंधरवडा शिल्लक असतानाही शहरात आकाशामध्ये मोठ्या संख्येने पतंग उडताना दिसत आहेत. बाजारात नायलॉन मांजा, काचेचा मांंजा याची सर्रासपणे विक्री केला जात असून, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या नायलॉन मांजामुळेच भारती जाधव या महिलेला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पालकांनीसुद्धा आपल्या मुलांच्या हाती पतंगबाजीसाठी नायलॉन मांजा किंवा काचेपासून तयार केलेला मांजा तर नाही ना, याबाबत जागरूक असायला हवे. एक जबाबदार नागरिक म्हणून स्वयंस्फूर्तीने नायलॉन मांजावर बहिष्कार टाकणे गरजेचे असल्याचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी सांगितले. दरम्यान, शहरात कोठेही चोरी-छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा, काचेच्या मांजाची साठवणूक करून विक्री करताना आढळल्यास अथवा पतंग उडविताना या प्रकारच्या मांजाचा वापर करताना कोणी दिसून आल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेतून देण्यात आला आहे.
--इन्फो--
पोलिसांच्या कारवाईकडे आता लक्ष
अधिसूचना जारी करत पोलिसांनी नायलॉन मांजा वापरावर निर्बंध असल्याचे स्पष्ट केले असले तरी, शहरात चोरट्या मार्गाने विक्री केल्या जाणाऱ्या नायलॉन मांजावर पोलिसांकडून कशाप्रकारे आळा घातला जातो, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे. पंचवटी, रविवारकारंजा, जुने नाशिक, वडाळागाव, सिडको, नाशिक रोड, देवळाली गाव आदी भागात नायलॉन मांजा व काचेच्या मांजाचाच बोलबाला असल्याची जोरदार चर्चा आहे.