नाशिक : शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी जनतेची कामे करावी, त्यासाठी संपर्कमंत्र्यांपासून जिल्'ातील मंत्र्यांची मदत घ्यावी. जनतेची कामे केल्यास पुन्हा उमेदवारी दिली जाईल आणि कामे केली नाही तर तिकीट कापून घरी बसवू, असा इशारा शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी दिला. काल (दि.२६) जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापती शोभा सुरेश डोखळे यांच्या कक्षात संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी भेट देऊन जिल्हा परिषदेतील शिवसेना पदाधिकारी व सदस्यांच्या कामांचा आढावा घेतला. यापुढे शिवसेना जिल्हा परिषद सदस्य असलेल्या प्रत्येक गटात जाऊन स्वतंत्र बैठका घेऊ. शेतकऱ्यांचे प्रश्न व ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी जिल्'ाचे संपर्कमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडून प्रश्न सोडविण्याबाबत सदस्यांनी पाठपुरावा करावा. चांगले काम केल्यास पुन्हा तिकीट व उमेदवारी दिली जाईल. मात्र, जनतेची कामे न केल्यास तिकीट न देताच घरी बसवू, असा इशारा त्यांनी यावेळी आढावा बैठकीत दिला. तसेच यापुढील काळात गटगटात जाऊन बैठकांचे आयोजन करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी गटनेते प्रवीण जाधव यांनी रस्त्यांच्या कामांसह पाणीपुरवठा योजना मंजूर करताना आणि निधी वितरण करताना मंत्रालयातून दुजाभाव केला जात असल्याची तक्रार केली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख कारभारी अहेर, जिल्हा बॅँकेचे संचालक सुहास कांदे, सभापती शोभा सुरेश डोखळे, सदस्य सुरेश पवार, प्रशांत बच्छाव, उपजिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
शिवसेना संपर्कप्रमुखांची जिल्हा परिषदेत धडक इशारा
By admin | Published: May 27, 2015 12:35 AM