सिडको - शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभाग क्रमांक २६ मध्ये सेनेला टक्कर देण्यासाठी भाजपा, माकपा व मनसेसह अन्य पक्षांनी जोरदार तयारी दर्शविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चौरंगी लढतीची शक्यता आहेच, शिवाय यापूर्वीच्या पराभवांचे हिशेब चुकते करण्याची संधी लाभणार आहे. या प्रभागात राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची ताकद कमी असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
सिडको व सातपूर अशा दोन विभागात जोडल्या गेलेल्या या प्रभागात प्रामुख्याने शिवशक्ती नगर,खुटवड नगर, चाणक्य नगर,वावरे नगर, साळुंके नगर, केवळ पार्क, जाधव संकुल, भोर टाऊनशिप चुंचाळे शिवार,रामकृष्ण नगर, संजीव नगर, विराटनगर आदी भागाचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत भागवत आरोटे, दिलीप दातीर, हर्षदा गायकर हे तीन नगरसेवक सेनेकडून निवडून आले होते तर अन्य पक्षाच्या भाजपाच्या अलका अहिरे या प्रभागातून निवडून आल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने दिलीप दातीर यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत मनसेत प्रवेश केला. दातीर यांचा पराभव झालाच परंतु त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही दिलीप दातीर यांचा पराभव झाला. त्यांच्या जागी शिवसेनेचे नगरसेवक म्हणून मधुकर जाधव हे निवडून आले. यामुळे शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध झाले. अर्थात या परिसरातून अलका अहिरे दोनवेळा निवडून आल्या आहेत. त्यांचे पती कैलास अहिरे देखील यंदा इच्छुक आहेत. यापूर्वी याच परिसरात माकपने चांगला प्रभाव निर्माण केला असल्याने ॲड. तानाजी जायभावे यांनी पंधरा वर्षे नगरसेवकपद भूषवले आहे, त्यांच्या बरोबरच शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक भागवत आरोटे हे दावेदार आहेत.
एकेकाळी या प्रभागात भंगार बाजार हा कळीचा मुद्दा हेाता. तो दिलीप दातीर यांच्या पथ्यावर होता; मात्र पोटनिवडणुकीत हा मुद्दा प्रभावहिन ठरला होता. आता नवीन राजकीय समीकरणात नवीन मुद्दे पुढे येऊ शकतात. दातीर मनसेचे शहराध्यक्ष झाल्याने त्यांचा प्रभाग हा त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा ठरणार आहे. त्यामुळे आता या प्रभागात शिवसेना-भाजपा बरोबरच मनसेतही लढाई होण्याची चिन्हे आहेत.