- संजय वाघनाशिक : ‘आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे संस्कार होतात, ते दृढतम असतात ’- अशा शब्दात विश्वातील प्रत्येक मातेची महती अधोरेखित करणा-या मातृभक्त साने गुरूजींच्या आईचे मोल आणि प्रभाव त्यांच्या शंभराव्या स्मृतीदिनीही चिरस्मरणात आहेत.मनाला घाण लागू न देण्याचा मौलिक संस्कार रूजविणा-या यशोदा सदाशिव साने यांचे २ नोव्हेंबर १९१७ रोजी निधन झाले होते. त्यांच्या निर्वाणाला गुरुवारी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. कोकणातील एका सर्वसामान्य कुटुंबातील ही महिला छोट्या श्यामवर केलेल्या संस्कारांमुळे मराठी माणसाच्या हृदयात स्थान मिळवून आहेत.मराठी साहित्याला लाभलेला अनमोल संस्कारांचा ठेवा म्हणून साने गुरूजींच्या ‘श्यामची आई’ या ग्रंथाकडे पाहिले जाते. हा ग्रंथ नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात ९ ते १३ फेब्रवारी १९३३ दरम्यान आकारास आला होता. सावित्री व्रत ते आईच्या श्राद्धापर्यंतचा ४२ रात्रींचा प्रवास शब्दबद्ध झाला आणि महाराष्टÑातील घराघरात हा संस्कारग्रंथ पोहोचला.
साने गुरूजींच्या आईचे मोल आणि प्रभाव त्यांच्या शंभराव्या स्मृतीदिनीही चिरस्मरणात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 1:55 AM