नाशिक: शिवसेनेचे दुसºया क्रमांकाचे नेते म्हणून राज्याभिषेक झालेले युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पहिल्याच भाषणामुळे राज्यातील शिवसैनिकांबरोबरच नाशिकमधील अनेक भाऊ, भाई, दादा, नाना, आप्पांसह तमाम टोपणनाव परिचित नेत्यांचा रसभंग झाला आहे. यापुढे होर्डिंग्जवर अशा प्रकारची नावे लिहू नयेत, अशी तंबीच युवराजांनी दिली असल्याने खरी नावे लिहिण्याची वेळ संबंधितांवर आली आहे.राजकारणात मोठे होणारे आणि होऊ इच्छिणारे नेते, कार्यकर्त्यांमध्ये भाई, दादा, नाना, आप्पा, अण्णा, काका, मामा अशा प्रकारच्या विशेष नामाने प्रसिद्ध होण्यासाठी चढाओढ असते. सर्वच पक्षांमध्ये अशाप्रकारचे नाव असलेले कथित मोठे नेते बघून छोट्या कार्यकर्त्यांमध्येदेखील स्पर्धा वाढते. अशा नावानेच लोकांनी आपल्याला हाका माराव्या किंवा परिचित व्हावे, यासाठी कार्यकर्ते संबंधित नेत्याला त्या नावाने संबोधित करतातच शिवाय ही उपाख्य नामे प्रसिद्ध व्हावीत यासाठी होर्डिंग्जचा आधार घेतला जातो. त्यातून लोकांना अशी नावेदेखील कळतात. परंतु आता युवराजांनी अस्सल व्हा, असा सल्ला पहिल्याच मार्गदर्शन सत्रात दिला आहे. आदित्य ठाकरे यांची शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यानंतरचे नेते म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी पहिल्याच भाषणात अशाप्रकारची नावे वापरण्यास मनाई केली. युवा पिढीला होर्डिंग्जवर असलेली अशाप्रकारची नावे आवडत नाही. त्यामुळे अशाप्रकाची नावे वापरू नका, असाच थेट सल्ला दिल्याने नाशिकमधील अशा सर्वच उपाख्य नावे असणाºयांची अडचण झाली. आदित्य ठाकरे हे स्वत: युवक असल्याने त्यांना युवकांच्या भावना कळतात, असे मानले जाते. युवा सेनेची जबाबदारी घेतल्यानंतर आता शिवसेनेला तरुण करण्यासाठी त्यांनी सामान्य युवकांचा राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता तेच पहिल्या भाषणात मांडले आहे. त्यामुळेच संबंधितांची अडचण झाली आहे.नाशिकरोडचे नाना, त्यापलीकडे एक नव्हे तर दोन आप्पा, कार्यसम्राट आप्पा, दादा, भाई, मोठे अण्णा, धाकले अण्णा अशा सर्वांनाच आता काय करायचे, असा प्रश्न पडला असल्याचे सेनेतच सांगण्यात येत आहे. अशा टोपण नावाशिवाय नागरिकांना तो मीच असे कसे पटू शकेल, अशीही शंका काही दादा-भार्इंनी उपस्थित केली आहे.