सिन्नर: पुणे शिक्षण विभागाच्या शिक्षण संचालन काार्यालयात शिक्षण संचालक व नाशिक जिल्हा मुख्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात शालार्थ आयडीचे सर्व अधिकार शिक्षण उपसंचालक व विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना देण्यात आले. प्रत्यक्ष कामकाज १ एप्रिलपासून सुरु करण्याचे आदेश शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी दिले. नाशिक विभागाच्या ३४७ फाईल गेल्या अडीच वर्षापासून पुणे येथील शिक्षण संचालन कार्यालयात पडून होत्या. त्या सर्व फाईल १ एप्रिल पासून शिक्षण उपसंचालक व विभागीय अध्यक्ष यांच्याकडे पाठवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या फाईलमध्ये त्रूटी पूर्ततेमध्ये आहे व ज्या प्रपत्र दोन च्या फाईलवर नाशिक येथे सुनावण्या घेतल्या आहेत या सर्व फाईल तपासून १० दिवसाच्या आत यांना शालार्थ आयडी देण्याचे आश्वासन शिक्षण संचालक म्हमाणे यांनी मुख्याध्यापक संघाला दिल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली. महाराष्टÑातील सर्व विभागीय मंडळांच्या अध्यक्षांना व उपसंचालकांना व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शालार्थ आयडी देण्याबाबत कागदपत्रांची पडताळणी कशी करावी व पडताळणी करुन दहा दिवसांच्या आत त्या फाईलवर निर्णय घ्यावा लागणार आहे या स्वरुपाचे प्रशिक्षण दिले. गेल्या तीन वर्षापासून शालार्थ आयडी साठी शिक्षकांची मोठी फरफट होत होती. आता ती थांबणार असल्याचे संकेत मिळाले. या बैठकीसाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, संजय देसले, प्रकाश पानपाटील, भरत गांगुर्डे, एस. बी. काटे, संगिता बाफना, सुरेश शेलार उपस्थित होते.
प्रलंबित शालार्थच्या फाईल्स नाशिकला पाठविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 1:25 PM