नाशिक : येथील ज्येष्ठ कलासंग्राहक व छायाचित्रकार मुरारी शंकरलाल जाजू (८८) यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, चार भाऊ, दोन बहिणी, नातवंडे असा परिवार आहे. जाजू यांच्या इच्छेनुसार नेत्रदान करण्यात आले. जाजू हे जुन्या पिढीतील ख्यातनाम छायाचित्रकार होते. त्यांचा अमर आर्ट स्टुडिओ प्रसिद्ध होता. ते कॅमेरे आणि विविध धातूंच्या जुन्या देव-देवतांच्या मूर्तींचे संग्राहक होते. प्राचीन व मौल्यवान मूर्तींचा त्यांचा संग्रह मोठा होता. अनेक कलाकुसरीच्या वस्तू जमा करण्याचा त्यांना छंद होता. या छंदातूनच वयाच्या विसाव्या वर्षापासून अगदी अखेरपर्यंत त्यांनी धातूंच्या मूर्ती संग्रहित केल्या. त्यांच्या घरात किमान दोन ते अडीच हजार मूर्ती आहेत. याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा कॅमेराही त्यांच्या संग्रहात आहे. देश-विदेशातील अनेक कॅमेऱ्यांसह १० ग्रॅम वजनाचा आणि हाताच्या चिमटीत पकडून छायाचित्र काढता येईल, एवढा सूक्ष्म (मायडी) कॅमेऱ्याचाही त्यांच्या संग्रहात समावेश आहे. त्यांच्याकडे छोट्या- मोठ्या आकारातील तब्बल १०८हून अधिक कॅमेरे आहेत. त्यात १९३५ सालच्या जपानच्या कॅमेऱ्याचाही समावेश आहे. त्याद्वारे त्यांनी स्टिंग आॅपरेशन करून इंग्रज राजवटीतील २२ अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. जाजू हे केवळ संग्राहकच नव्हे, तर उत्तम लेखकही होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आदि भाषांमधील दैनिके व नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. सामाजिक कार्यातही त्यांचे भरीव योगदान होते. अनाथ आश्रमासह अनेक संस्थांना त्यांनी देणग्याही दिल्या होत्या. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील हनुमानाचे जन्मस्थळ असलेल्या अंजनेरी येथे रामभक्त हनुमानाची १८ फुटी मूर्ती त्यांच्याच प्रयत्नाने व त्यांच्या मालकीच्या जागेवर मंदिराच्या रूपात साकारलेली आहे.
ज्येष्ठ कलासंग्राहक मुरारी जाजू यांचे निधन
By admin | Published: July 17, 2016 12:29 AM