सातपूर : ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु अशाही परिस्थितीत न डगमगता योग्य पर्याय शोधून जीवन सुकर करावे, असे प्रतिपादन फेस्कॉनचे नाशिक विभागीय अध्यक्ष केदुपंत भालेराव यांनी केले.कुंभार समाज उत्कर्ष मंडळ संचलित कुसुम ज्येष्ठ नागरिक संघाचा स्नेहमेळावा हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर होते. फेस्कॉनचे राज्य संघटन सचिव उत्तमराव तांबे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. निरोगी जीवन जगण्याचा मंत्र या विषयावर हुदलीकर यांनी मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समितीचे अध्यक्ष सोमनाथ सोनवणे, माजी अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, शहर अध्यक्ष बाळासाहेब जोर्वेकर, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संघटनेचे अध्यक्ष मोहन जगदाळे, कार्याध्यक्ष रंगनाथ सूर्यवंशी, राज्य सल्लागार सोमनाथ सोनवणे, नरेंद्र कलंकार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कुंभार समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष प्रा. तुळशीराम मोरे यांनी केले. सूत्रसंचालन सचिव गुलाबराव सोनवणे यांनी केले. स्वागत उपाध्यक्ष राजेंद्र सावंदे यांनी केले. पुंडलिक सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी जगदीश मोरे, गंगाधर जोर्वेकर, के. के. चव्हाण, पोपट बोरसे, उषा चित्ते, उषा बोरसे आदींसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ज्येष्ठ सभासदांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांनी परिस्थितीशी सामना करावा : केदुपंत भालेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 1:24 AM