सटाणा : ज्येष्ठ नागरिकांच्या कौटुंबिक समस्या लक्षात घेऊन विधिमंडळात सर्वपक्षीय पातळीवर सामंजस्याने भूमिका घेतली जात असून, सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल अहेर यांनी केले. येथील श्री यशवंतराव महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळ, वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या नगर-नाशिक प्रादेशिक अधिवेशनाच्या झालेल्या उद्घाटनप्रसंगी डॉ. अहेर बोलत होते. ज्येष्ठ नागरिकांचे वय वर्षे साठ करण्याची सरकारची भूमिका असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस विभक्त कुटुंबपद्धतीमुळे वाढू लागल्या आहेत. एकत्रित कुटुंब प्रणाली हद्दपार होत असल्याने ज्येष्ठांकडे दुर्लक्ष केले जात आहे; मात्र संस्कार असलेल्या पिढीने आजही ज्येष्ठ नागरिकांना मानसन्मान बहाल केलेला आहे, असे मत आमदार डॉ. अहेर यांनी शेवटी व्यक्त केले.अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी सुरेश बागड होते. व्यासपीठावर माजी खासदार प्रताप सोनवणे, मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, उद्योजक वर्धमान लुंकड, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, सतीश कलंत्री, स्वागताध्यक्ष जिभाऊ सोनवणे उपस्थित होते.याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रेय चौधरी, ग्रामीण अध्यक्ष अनंत घोलप, सचिव केदूपंत भालेराव, बाबुलाल मोरे, एन. व्ही. राणे, बाबुलाल नेरकर, केशव सोनवणे, भास्कर सोनवणे, वि. रा. पंडित, राजेंद्र बंब, विश्वनाथ येवला आदींसह नगर नाशिक विभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने यशवंत स्मरणिकेचे प्रकाशन माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष सुरेश बागड यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने वयोमर्यादा घटविण्याचे आवाहन केले. तसेच शासनदरबारी आमच्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जबाबदारी घेण्याचेही त्यांनी आवाहन केले.
सटाण्यात ज्येष्ठ नागरिकांचे अधिवेशन राहुल अहेर : सरकार ज्येष्ठांच्या पाठीशी, स्मरणिकेचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:13 AM