संजय पाठक, नाशिक : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांनी आज मुंबई येथे उध्दव सेनेत प्रवेश केला. त्यांना प्रवेश करता क्षणीच विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. गुळवे यांच्या प्रवेश सोहळ्यास उध्दव सेनेचे नेते खासदार संजय राऊत तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर तसेच विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष (कै.) गोपाळराव रावळाजी गुळवे यांचे संदीप गुळवे हे प्रतिनिधी असून १९९६ पासून ते सक्रीय राजकारणात आहेत. १९९७ मध्ये गंगापूररोड परीसरातून नाशिक महपाालिकेची निवडणूक लढवली त्यात त्यांचा पराभव झाला होता. नंतर ते सलग दहा वर्षे नाशिक महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य होते.
२०१२ ते २०१७ या दरम्यान ते जिल्हा परिषदेच्या घोटी गटातून ते सदस्य म्हणून निवडून आले होते. नाशिक जिल्हा औद्योगिक संघावर ते २००९ पासून ते उपाध्यक्ष आहेत. तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतही ते संचालक म्हणून निवडून आले होते. महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ ही त्यांची शिक्षण संस्था असून त्या माध्यमातून ते शिक्षण क्षेत्रात कार्य करीत आहेत.