नाशिक-
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश जितमल छाजेड यांचे आज रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास निधन झाले. ते 75 वर्षांचे होते
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती त्यानंतरही नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी जाण्यासाठी निघाले होते मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले आणि काही वेळानंतर त्यांना हृदय विकाराचा धक्का आल्याने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच नागपूर येथे कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी गेलेले सर्व पदाधिकारी नाशिकला निघाले आहेत. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा लौकिक होता काँग्रेस पक्षाशी निष्ठावान असे त्यांचे घराणे होते युवक काँग्रेस पासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांनी पक्षातील शहर आणि प्रदेश पातळीवरील अनेक संघटनात्मक पदे भूषवली तसेच तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते जवळचे सहकारी होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छाजेड यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली होती नाशिकच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक चळवळीतील एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, मुलगा प्रीतिश हितेंद्र आणि आकाश असा परिवार आहे. बुधवारी (दि 11) नाशिकच्या काँग्रेस भवनात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी 6 वाजता नाशिक अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.