नाशिक : समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक आणि आनंद निकेतन या प्रयोगशील शाळेचे संस्थापक अरुण ठाकूर (६५) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर देहदान केले असल्याने त्यांचे पार्थिव वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपुर्द केले जाणार आहे.नाशिकमधील समाजवादी चळवळी आणि आंदोलनांमध्ये ठाकूर यांचा मोलाचा सहभाग होता. लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष मूल्य हे त्यांच्या चिंतनाचे आणि लेखनाचे विषय होते. गेल्या बारा वर्षांपासून आनंद निकेतन या प्रयोगशील शाळेसाठी आणि मराठी शाळांच्या चळवळीसाठी ते झटत होते. अशी शाळा सुरू करून त्यांनी मराठी शाळांसाठी नवी उमेद जागविली. त्यांनी विपुल लेखनही केलेले आहे. नरक सफाईची गोष्ट, टीचर हे त्यांची अनुवादीत पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ठाकूर हे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यामध्ये अग्रेसर होते. नाशिक महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठीची मोठी चळवळ उभी केली होती. समाजवादी विचारांची तुकडी तयार करण्यामध्ये त्यांचा वाटा होता. समता आंदोलनाच्या पायाभरणीमध्ये तत्कालीन तरुणांची तयारी करून घेतली. दरम्यान, त्यांचे पार्थिव शुक्रवारी (दि. २२) सकाळी ९ वाजता पी अॅँड टी कॉलनीतील निवासस्थानी दर्शनासाठी आणले जाणार आहे.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अरुण ठाकूर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 1:01 AM