नाशिक : ज्येष्ठ साहित्यिक व अनुष्टुभ परिवारातील ज्येष्ठ संपादक गोविंदा तुकाराम तथा गो. तु. पाटील यांचे रविवारी (दि.१८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज, सोमवारी (दि.१९) सकाळी ११ वाजता येवला येथील त्यांच्या कृतज्ञता निवासस्थानापासून निघणार आहे. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी साहित्यिक व संपादक हरपला आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. गो. तु. पाटील यांचे मूळगाव सूनसगाव खुर्द, ता.जामनेर असून, त्यांचे माध्यमिक शिक्षण कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ येथे बहिणीकडे झाले. त्यानंतर त्यांनी उच्चशिक्षण घेतले. याचवेळी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. तीच त्यांची कर्मभूमी झाली. नोकरी सांभाळतांनाच त्यांनी मराठी साहित्यातदेखील आपले कार्य सुरू केले. अनुष्टुभ सारखे दर्जेदार नियतकालिक त्यांनी चालविले.
त्याबरोबरच स्तंभलेखन, संपादन, मुलांसाठी संतचरित्र लिहिणारे गो. तु. पाटील यांनी वि. वा. शिरवाडकरांच्या हयातीत ’नटसम्राट समीक्षा’ या पुस्तकांचे संपादन केले आहे. ’ओल अंतरीची’ ही त्यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे. चार दशके सांस्कृतिक विश्वात वावरणारे गो. तु. पाटील अजातशत्रू, व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जायचे. गेवराई (बीड), मालेगाव, येवला या ठिकाणी त्यांनी महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. विद्यार्थिप्रिय शिक्षक ही त्यांची ओळख असून, ते प्रगत विचारांचा सतत पाठपुरावा करीत राहिले.