नाशिक : एक अत्यंत लोकप्रिय गणित शिक्षक, प्रचंड अभ्यासू गणज्ज्ज्ञ आणि विविध संस्थांमध्ये अत्यंत झोकून देऊन काम करणाऱ्या समर्पित व्यक्तिमत्त्वाला नाशिक मुकल्याचा सूर ज्येष्ठ गणितज्ज्ञ दिलीप गोटखिंडीकर यांच्या शोकसभेत व्यक्त करण्यात आला. तसेच अधिकारवाणी आणि स्थितप्रज्ञतेचे प्रतीक असलेल्या व्यक्तीला आपण मुकलो असल्याचीही भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास कुर्तकोटी सभागृह येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ज्ञ आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक दिलीप गोटखिंडीकर यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत विविध मान्यवरांनी प्रा. गोटखिंडीकर यांच्यबद्दलच्या भावना व्यक्त करून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. २००३ साली गणित अध्यापक मंडळाची स्थापना केल्यानंतर शाळा संपल्यानंतर पुन्हा वर्गशिक्षकांचा सहवास लाभल्याची आठवण गणित अध्यापक मंडळाचे भास भामरे यांनी सांगितली. प्रा. गोटखिंडीकर यांचे लिखाण एकहाती होते आणि त्यात खाडाखोड आणि पुनर्लिखाण कधीही नसायचे, गणिताबद्दलचा त्यांचा व्यासंग खूप मोठा असल्याचेही भामरे यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नाशिक एज्युकेशन सोसायटी, विद्यार्थी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत माजी आमदार निशीगंधा मोगल, प्रा. दिलीप फडके, नाना जुनागडे, आनंद कचोले, चंद्रशेखर वाड, वि.भा. देशपांडे, राजेंद्र निकम, अशोक तापडीया, प्रा. नरेंद्र देशमुख, अनिल खांडकेकर, श्रीराम महाजन, प्रमोद कुलकर्णी, अजय गोटखिंडीकर, राजेंद्र लोंढे आदींनी भावना व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली. शोकसभेचे सूत्रसंचालन रवींद्र मोडक यांनी केले.
इन्फो
भास्कराचार्य नगरीसाठी पुढाकार
नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्याध्यक्ष महेश दाबक यांनी प्रा गोटखिंडीकर हे कुठल्याही विषयाची सखोल मांडणी करायचे, असे नमूद केले. एकल विद्यालय आणि भास्कराचार्य नगरी निर्मितीसाठी त्यांचा विशेष पुढाकार असल्याचीही आठवण दाबक यांनी यावेळी सांगितली. प्रा गोटखिंडीकर सर विद्यार्थी परिषद तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होते. तेव्हापासूनच त्यांचा लाभलेला सहवास, नेदरलॅण्डला गेल्यानंतर त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली ओळख, शिक्षक म्हणून त्यांचा सुरू झालेला प्रवास, संस्थेच्या विविध पदांवर केलेले काम, गणितासह विज्ञान विषय शिकविण्याचा हातखंडा असलेल्या प्रा. गोटखिंडीकर यांच्याबद्दलच्या आठवणींना यावेळी दाबक यांनी भावपूर्ण शब्दात उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण केली.