नाशिक : ज्येष्ठ तबलावादक तसेच पेठे हायस्कूलचे माजी शिक्षक नवीन तांबट यांचे शुक्रवारी (दि. ४) सकाळी ८ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे हायस्कूलमध्ये त्यांनी कलाशिक्षक म्हणून प्रदीर्घकाळ सेवा दिली.
तांबट हे उत्कृष्ट तबला, कोंगो आणि नालवादक म्हणून प्रख्यात होते. नाशिकच्या संगीत क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. संगीताचे व्यासंगी असलेले तांबट सर यांनी ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडकेेे, यशवंत देव, अनिल मोहिले अशा दिग्गजांना साथसंगीत केली होती. त्याशिवाय संगीतकार बाळ भाटे, गायक अनंत केळकर यांच्या समवेतदेखील संगीतात त्यांनी काम केले होते. तसेच अनेक स्थानिक महोत्सव, कार्यक्रमांमध्ये मोठमोठ्या कलाकारांना तबल्यावर साथसंगत केली होती. अत्यंत सामान्य परिस्थितीमधून पुढे आलेले तांबट नाशिकच्या प्रथितयश पेठे विद्यालयात १९७० साली कलाशिक्षक म्हणून रुजू झाले होते. पेठे विद्यालयातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा पुढाकार असायचा. स्व. तात्यासाहेब शिरवाडकर तसेच स्व. वसंतराव कानेटकर यांच्या उपस्थितीमधील लोकहितवादी मंडळाच्या कार्यक्रमांतही त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. शाळेत त्यांचे विषय हस्तकला व चित्रकला असले तरी तेवढ्यापुरते त्यांचे क्षेत्र सीमित नव्हते. सरांनी स्वरदा सुगम संगीतवर्गाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले. अत्यंत प्रेमळ आणि लाघवी स्वभावामुळे संगीत क्षेत्रातील सर्व वयोगटातील संगीत आणि कलाप्रेमींचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने नाशिकचा सच्चा कला आणि संगीतप्रेमी शिक्षक हरपला आहे. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना एनडीएसटी सोसायटी, लायन्स क्लब यांच्यासह नाशिकच्या विविध संस्थांनीही पुरस्कार देऊन गौरवले हाेते. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि भावगीत गायिका शुभदा तांबट, मुलगा निनाद, कन्या गीतांजली आणि सून असा परिवार आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतसाधना करून संगीत क्षेत्राची सेवा करीत आहे.
फोटो
०४तांबट