लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मंगळवारी सायंकाळी मेहेर सिग्नलवर आढळून आलेल्या बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती़ या माहितीनंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये कपडे आढळून आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला़ दरम्यान, या घटनेमुळे परिसरात गर्दी जमल्याने वाहतूक कोंडी झाली होती़मंगळवारी सायंकाळी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मेहेर सिग्नलवर बेवारस बॅग आढळून आली़ जागृत नागरिकांनी ही माहिती सरकारवाडा पोलिसांना कळविताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, बॉम्ब शोधक व नाशकचे पोलीस निरीक्षक ए. डी. पाटील हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. प्रारंभी श्वान तसेच यंत्राद्वारे बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये आक्षेपार्ह काही नसल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी बॅग उघडून बघितली़पोलिसांना या बॅगमध्ये दि न्यू इंडिया इन्श्योरन्स कंपनीचे एजंट राजेश काळकर यांचे ओळखपत्र, कपडे व इन्श्युरन्सची कागदपत्रे आढळून आली़ दरम्यान, बॉम्बच्या अफवेने परिसरातील गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना चांगलीची कसरत करावी लागली़
मेहर सिग्नलवर बेवारस बॅगमुळे खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 10:38 PM