तयार करण्यात येऊन त्याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच वाढत्या रुग्णसंख्येच्या नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी लोकांमध्ये कोरेाना निर्बंध पाळण्यासाठी समुपदेशन व प्रबोधन करून योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
शनिवारी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती, लसीकरण व उपाययोजना आढावा बैठक घेण्यात आली. ते म्हणाले, जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी जिल्ह्यात २९ ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केंद्र सुरू करण्यात येत आहे. ज्यामुळे भविष्यातील ऑक्सिजनची गरज पूर्ण करणे शक्य होणार आहे. तसेच आदिवासी भागातील नागरिक ज्या डॉक्टर व तेथील स्थानिक औषधोपचार करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवून आजारपणात इलाज करतात, अशा डॉक्टर्स व स्थानिक लोकांची बैठक घेऊन त्यांना कोरोनाच्या लढाईत सहभागी करून घेण्यात यावे, जेणे करून त्यांच्यामार्फत आदिवासी भागातील नागरिकांमध्ये कोरोना आजाराच्या उपचाराविषयी जागृती होऊन आदिवासी भागातील कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी मदत होईल. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी ऑनलाइन नावनोंदणी करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्याने राज्य शासनाने लसीकरणाच्या नावनोंदणीसाठी नवीन प्रणाली विकसित करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सर्व शासकीय रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यात यावे, शहराला लागून असलेल्या तालुक्यात रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण अधिक आहे. तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या अंत्यविधीसाठी नातेवाइकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, नियमबाह्य लग्न सोहळे यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस विभागाला केल्या. नरहरी झिरवाळ यांनी जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये आदिवासी समाज कोरोनावरील उपचार व लसीकरणासाठी पुढे येत नसून त्यांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांना कोरोना आजाराचे गांभीर्य व लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात यावे, अशी सूचना केली. या बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन, रेमडेसिविर पुरवठ्याबाबतची माहिती दिली.