नाशिक :नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, संभाव्य दक्षतेचा एक भाग म्हणून त्र्यंबकेश्वर येथे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे कोरोना संशयित व बाधितांसाठी पन्नास खाटांचा विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विलगीकरण कक्षासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती गुरुपीठाचे व्यवस्थापक चंद्रकांतदादा मोरे यांनी दिली. नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहेत. मालेगाव येथे हॉटस्पॉट असला तरी अन्यत्र भागांत तो पसरू नये, यासाठी शासकीय यंत्रणा विशेष लक्ष देत असून, अनेक ठिकाणी खासगी जागांचा विचार करण्यात आला आहे. त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठाची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या कक्षाची तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी मुरकुटे, पोलीस उपअधीक्षक भीमाशंकर ढोले, वैद्यकीय अधिकारी मंदाकिनी बर्र्वे, डॉ. योगेश मोरे, डॉ. भागवत लोंढे यांनी पाहणी केली. ज्यावेळी देश किंवा राज्यावर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती येते, त्यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग मदतीसाठी पुढाकार घेते आणि गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंनामदत करतात. कोरोनामुळे सध्या लॉकडाउन असल्यामुळे मजूर आणि कामगारांचे हाल होत आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वैद्यकीय सेवा आणि अन्नदानाचे कार्य हाती घेतले आहे.
समर्थ गुरुपीठात विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:23 PM