नाशिक : जन्माप्रमाणेच मृत्यू हा आयुष्याचा एक भाग आहे, सोहळा आहे असे मानून रुग्ण, त्याचे नातेवाईक प्रत्येकाने त्याचा स्वीकार, त्याचे स्वागत करण्याची तयारी ठेवावी. तरच आजार, त्यामुळे रुग्ण, डॉक्टर, नातेवाइकांना होणारा त्रास, त्यातून निर्माण होणाºया सामाजिक, कायदेशीर समस्या काहीअंशी कमी होऊ शकतील, असा सूर ‘सुखान्त जीवनाचा’ या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. गुरुवारी (दि.५) शंकराचार्य संकुल येथे महाराष्टÑ असोसिएशन आॅफ फिजिशियन्स (मॅपकॉन) येथे सायंकाळी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.चर्चासत्रात क्रिटीकल केअर तज्ज्ञ डॉ. शिवा अय्यर, डॉ. प्रदीप कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उमेश नागपूरकर, मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. मनोज गुल्हाणे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता बोरकर, अॅड. अविनाश भिडे यांनी भाग घेत ‘मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर निर्माण होणारे प्रश्न व त्यांचे व्यवस्थापन’ याविषयी महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट केल्या. असाध्य रोगांनी आणि वार्धक्याने ग्रस्त झालेल्या रुग्णांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मृत्यूला धैर्याने कसे सामोरे जावे आणि होणारे क्लेश कमीत कमी कसे करावेत, याबद्दलचे सखोल मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. तसेच लहान-मोठ्या आजारांची रुग्णाला स्पष्ट कल्पना देणे, त्याच्यावर करण्यात येणाºया उपचारांची कल्पना देत निर्णय प्रक्रियेत त्याला सहभागी करून घेणे, रुग्ण व नातेवाइकांचा आजार व त्याच्या परिणामांचा स्वीकार, आर्थिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय दृष्टिकोनातून उद्भवणारे प्रश्न व त्याचे व्यवस्थापन, इच्छामरण, सुलभ मरण, रुग्णाची काळजी, मृत्यूपत्र, रुग्णाचे अधिकार आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नीलम किर्लोस्कर यांनी यावेळी स्वानुभवाद्वारे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाची कशी काळजी घ्यावी याबद्दलचे अनुभव सादर केले. वंदना अत्रे यांनी सूत्रसंचालन केले.
सुखान्त जीवनाचा : मॅपकॉनच्या चर्चासत्रातील सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 12:23 AM