नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा नागरिकांबरोबरच प्राण्यांनादेखील फटका बसला आहे. चाऱ्याचे भाव दुप्पट म्हणजे जवळपास साडेपाच हजार रुपये टन इतके झाल्याने नाशिकमधील गोशाळा अडचणीत आल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक गावांत चारा शिल्लक आहे. परंतु गावांनी शहरी भाागातून किंवा अन्य ठिकाणहून येणाºया नागरिकांना गावबंदी केल्याने चारा असूनही तो आणता येत नाही अडचण झाली आहे. गेल्या २३ मार्चपासून देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदी सुरू आहे. त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता बाकी सर्व बाजारपेठा बंद झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच बंदचा परिणाम मुक्या प्राण्यांवरदेखील होत आहेत. नाशिक जिल्ह्यातील गो शाळांनादेखील त्याचा फटका बसला आहे. नाशिकमधील अनेक गोशाळांपर्यंत चाराच पोहोचत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. दळणवळणाची साधने बंद असून अनेक ठिकाणी गावांमध्ये प्रवेश करण्यास मनाई असल्यानेदेखील चारा आणता येत नसल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी एका गोशाळेच्या बाबतीत असा प्रकार घडल्यानंतर महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी मध्यस्थी केल्यानंतर गावकऱ्यांनी चारा नेण्यासाठी परवानगी दिली होती. परंतु अन्य अनेक गोशाळामंध्ये अडचणी येत आहेत. संचारबंदीमुळे मजूर उपलब्ध नाही. काही ठिकाणी चारा आणि मजूर उपलब्ध आहेत. परंतु मजूर गावकºयांच्या विरोधात जाऊन चारा भरण्यास तयार नाही. सिडकोतील मंगल गोवत्स सेवा ट्रस्ट संचलित गो शाळेत सध्या २४ गायी आणि वासरे आहेत. चार महागल्याने या गो शाळांमध्ये एक वेळ चारा आणि एक वेळ भाजीपाला दिला जात असल्याचे या गोशाळेचे संचालक पुरुषोत्तम आव्हाड यांनी सांगितले. सध्या चाºयाचे दर अडीच हजारांवरून साडेपाच हजार रुपये प्रति टन असे झाले आहेत. त्यातच संचारबंदीमुळे शहराकडे चारा येत नाही, अशी अवस्था आहे. सध्या तर गोशाळांना सहकार्य करणाºया दानशुरांनी पाठ फिरवल्यानेदेखील खर्च निघणे कठीण झाले आहे. तपोवनातील कृषी गो सेवा ट्रस्टच्या गो शाळेत २०० गायी आहेत. परंतु येथे सध्या चारा पाण्यासह अनेक अडचणी आहेत. सध्या महावीर इंटरनॅशनलसारख्या संस्थाच्या मदतीने गो शाळा कशी तरी सुरू आहे. परंतु लॉकडाउन आणि संचारबंदी वाढल्यास अडचण होणार आहे.अर्थात, काही गो शाळांकडे पूर्वनियोजनानुसार अगोदरच चाºया पाण्याची व्यवस्था असल्याने अडचण उद््भवत नाही. गंगापूररोडवरील मोरोपंत पिंगळे गो शाळेत नियोजनानुसार चाºयाचा रीतसर साठा करून ठेवण्यात आला असल्याने अडचण उद््भवलेली नाही असे या गोशाळेचे प्रमुख राजाभाऊ मोगल यांनी सांगितले. दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथे नंदिनी गो शाळेत चारशे गायी आहेत. मात्र, पूर्वनियोजनानुसार सध्या चारा असल्याने अडचण जाणवत नसल्याचे महेंद्र पोद्दार यांनी सांगितले.
गोधनाच्या क्षुधाशांतीसाठी गोशाळाचालकांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 9:50 PM