विकास एका औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीत औषधविक्री प्रतिनिधी म्हणून सुमारे साडेतीन वर्षांपासून नोकरीस होता. त्याच्यावर कंपनीमधील काही लोकांकडून कामाचा दबाव वाढविला जात असल्याची तक्रार त्याचा भाऊ आकाश याने म्हसरूळ पोलिसांकडे केलेल्या अर्जात केली आहे. अर्जामध्ये कंपनीतील तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती समजताच शनिवारी रात्री जिल्हा रुग्णालयात या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची मोठी गर्दी जमली होती. तसेच औषधे विक्री प्रतिनिधीही येथे आले होते. जोपर्यंत कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत विकासचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा सुरुवातीला घेण्यात आला; मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत ‘तक्रार अर्ज द्या, संबंधितांवर चौकशीअंती निश्चित कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन दिले. यानंतर आकाश याने तक्रार अर्ज म्हसरूळ पोलिसांकडे दिला आहे. विकास हा अत्यंत कष्टाळू आणि मनाने खंबीर होता. तो मोठ्या मेहनतीने प्रामाणिकपणे काम करत होता. मात्र नोकरीच्या ठिकाणी होणाऱ्या वारंवार मानसिक छळामुळे विकासने टोकाचा निर्णय घेतल्याचे त्याचा भाऊ आकाश याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मयत विकासच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
(फाेटो ३० विकास)