चांदोरी : सेवाकार्यातून मिळणारे समाधान हाच मोबदला हा भाव मनात ठेवून काम करत येथील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीने गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि गोदावरीला आलेल्या महापुरातून आतापर्यंत ४०० हून अधिक कुटूंबांचे स्थलांतर करत ६५ व्यक्तींचे प्राण वाचविले आहेत.गोदाकाठी वसलेल्या चांदोरी गावात गंगापूर आणि दारणा धरणातून विसर्ग सुरू झाला की पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. दरवर्षी चांदोरी-सायखेड्याला या महापुराचा फटका बसत असतो. अनेकदा वित्त हानी होत आलेली आहे याशिवाय, काही लोकांना प्राणही गमवावे लागले आहे. दरवर्षी ही आपत्ती पाचवीला पुजलेल्या चांदोरीला त्यातून वाचविण्यासाठी शासनाकडून मात्र ठोस काही उपाययोजना अंमलात आणल्या गेलेल्या नाहीत. मात्र, या आपत्तीचा सामना करण्याची मानसिकता तेथील गावकऱ्यांनी तयार करून ठेवलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गावातील काही तरुणांनी पुढाकार घेत ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना केली. ज्या-ज्यावेळी चांदोरीत पूरसदृश स्थिती उद्भवते त्यावेळी ही समिती बचावकार्यात झोकून देते. या व्यवस्थापन समितीत ३० लोक विनामोबदला काम करत आहेत. या समितीची स्थापना केल्यानंतर त्यासंबंधीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आली. त्यामुळे समितीचे कामकाज पाहून जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने समितीला एक रबर बोट, ५ लिव्ह जॅकेट बचावकार्यासाठी देण्यात आलेले आहे.गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. चांदोरीला २ आॅगस्ट रोजी पुराचा वेढा पडला त्यावेळी या समितीन ३०० हून अधिक व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविले. तर ४ आॅगस्टला आलेल्या महापुरात ४०० हून अधिक कुटुंबीयांचे स्थलांतर करताना ६५ व्यक्तींचे जीव वाचविले. समितीने महापूराच्या काळात दाखविलेले धैर्य आणि सेवाभाव याबद्दल परिसरात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
चांदोरीच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचा सेवाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 4:16 PM
तरुणाईचा पुढाकार : आतापर्यंत ६५ व्यक्तींचे वाचविले प्राण
ठळक मुद्देव्यवस्थापन समितीत ३० लोक विनामोबदला काम करत आहेत