लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे रविवारी (दि. ४) संध्याकाळी हजारो सेवेकरी व विविध क्षेत्रातील मान्यवरांसह गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत रामकुंडावर गंगापूजन करण्यात आले. यावेळी गंगापूजनाच्या निमित्ताने गोदावरीतील रामकुंडावर जमलेल्या श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या सेवेकऱ्यांनी, सृष्टीला हिरवीगार करण्यासाठी पर्जन्य सूक्ताचे पठन करून पर्जन्यराजास साकडे घातले. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून दशमीपर्यंत १० दिवस संपूर्ण देशभरात ‘गंगा-दशहरा’ उत्सव साजरा केला जातो. या कालावधीत गंगा गोदावरीचे उगमस्थान त्र्यंबके श्वर ते आंध्र प्रदेशातील समुद्रात विसर्जित होणाऱ्या राजमहेंद्रीपर्यंत गोदाकाठी देशभरातील सेवेकरी व भाविक गंगापूजन करून गंगा गोदावरी नदीचा माता म्हणून सन्मान करतात. याच पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या गंगापूजनाच्या सोहळ्यास ५० वर्षांपासून अधिक जुना इतिहास असून, गेल्या ५० वर्षांपासून स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे अखंडिपणे गंगापूजन सोहळा होत आहे. या सोहळ्यात पुरोहित संघांचाही सुरुवातीपासूनच सहभाग आहे. सेवामार्गातर्फे रविवारी करण्यात आलेल्या गंगापूजनाला खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, नगरसेवक वत्सला खैरे आदी मान्यवरांसह हजारो सेवेकरी उपस्थित होते.
सेवेकऱ्यांचे पर्जन्यराजाला साकडे
By admin | Published: June 05, 2017 1:00 AM