नाशिक : थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे, झीज भरून निघावी, या उद्देशाने हिवाळ्यात तीळ आणि गुळाचे सेवन केले जाते. त्यामुळे मकर संक्रांतीला आपल्याकडे विशेष महत्त्व दिले जाते. तिळामध्ये शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम, लोह, ऑक्लेजिक ॲसिड, प्रथिने, आणि जीवनसत्वे असतात, तर गुळामध्ये क्षार, लोह, सुक्रोज आणि ग्लुकोज ही तत्त्वे आहेत. या दोघांचे एकत्र सेवन केल्यास आरोग्यवर्धक ठरते. मात्र, गत चार महिन्यांच्या तुलनेत तिळाचे दर वाढले आहेत. ऑक्टोबर महिन्यात १३० ते १४० रुपये प्रतिकिलो असणारे तिळाचे दर १८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर गुळाच्या दरातही २ ते ३ रुपयांची वाढ होऊन ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे.
आरोग्यासाठी लाभदायी
तीळ आणि गूळ हे पदार्थ उष्ण असल्याने, शरीरातील उष्णता वाढते. हिवाळ्यात अस्थमा किंवा तत्सम श्वसनासंबंधी विकार असलेल्यांना त्रास उद्भवू लागतो. अशा व्यक्तींनी तीळगुळाचे सेवन केल्यास छातीमध्ये कफ साठत नाही, तसेच साचलेला कफ बाहेर पडतो. सांधेदुखी, अशक्तपणा कमी होतो.
उत्तरायणास सुरुवात
सर्वसाधारणपणे दरवर्षी मकर संक्रांत १४ जानेवारीला येते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या संक्रमणास ‘मकर संक्रांत’ असे म्हणतात. मकर संक्रांतीला ‘उत्तरायण’ असेही म्हणतात. म्हणजेच या दिवसापासून पुढचे सहा महिने हा उत्तरायणाचा कालावधी असतो.
असे वाढले दर
महिना --------तीळ ------गूळ
नोव्हेंबर ----१४० -----५८
डिसेंबर ------१६० ----५७
जानेवारी -----१८० -----६०
दररोज एक लाडू खावा
हिवाळ्यात वातावरण थंड असते. त्यामुळे शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी उष्ण पदार्थ खाल्ले जातात. तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ शरीराला उष्णता मिळवून देतात.
त्याचप्रमाणे, त्यातून कॅल्शियम, लोह यांसारखे आवश्यक घटकही मिळतात. हृदयविकार असलेल्या रुग्णांना तिळाच्या सेवनामुळे लाभ होतो. हिवाळ्यात तीळ आणि गुळाचा दररोज एक लाडू खाणे फायदेशीर ठरते.
- डॉ.रंजिता शर्मा, आहारतज्ज्ञ.
१४ जानेवारीला दुपारी २.२९ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. वाहन वाघ, उपवाहन घोडा असून, पिवळे वस्त्र परिधान केलेले, हाती गदा, केशर टिळा लावलेला आहे. सुगंधाकरिता जाईची फुले धारण केलेले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असून, नैऋत्य दिशेकडे मुख आहे.
- रत्नाकर संत, शास्त्र अभ्यासक