नाशिक : गेल्या दहा ते बारा वर्षांपासून बंद असलेली वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांची भरती पुन्हा सुरू करण्याची मागणी सेट, नेट व पीएच.डी.धारक संघर्ष समितीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य उदय सामंत यांच्याकडे केली आहे. नाशिक दौऱ्यावर असताना संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.२३) उदय सामंत यांची भेट घेत त्यांना मागण्यांविषयी निवेदन देत रिक्त असलेल्या जागांवर शंभर टक्के भरतीप्रक्रिया राबविण्याची मागणी केली.
प्राध्यापक भरतीप्रकिया बंद असल्याने अनेक प्राध्यापकांवर सध्या तासिका तत्त्वावर जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे सीएचबी म्हणजेच तासिका तत्त्व पूर्णत: बंद करून समान काम समान वेतन या आपल्या मुद्द्यावर संघर्ष समिती ठाम असून, याविषयी चर्चा करण्यासाठी समितीने दिलेल्या निवेदनाद्वारे वेळ मागतानाच सरकारने रिक्त जागांवर १०० टक्के प्राध्यापक भरती करावी, अशी मागणी केली आहे. अनेक तासिका तत्त्वावर शिकविणाऱ्यांचे वय ४५ ते ५०पर्यंत पोहोचूनही प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संपूर्ण आयुष्यच तसिका तत्त्वावर जाणार की काय, याची चिंता आता प्राध्यापकांना लागली आहे. प्राध्यापकांच्या या अवस्थेला सरकारी निर्णय जबाबदार असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी सेट,नेट व पीएच.डी.धारक संघर्ष समितीचे नाशिक विभाग समन्वयक प्रा.सतीश घोटेकर प्रा. दर्शन देवढे, डॉ. संभाजी पगार, प्रा. शशी माळोदे उपस्थित होते.
(आरफोटो-२३नेट सेट)- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना सेट, नेट व पीएच.डी.धारक संघर्ष समितीचे नाशिक विभाग समन्वयक प्रा. सतीश घोटेकर, प्रा. दर्शन देवढे, डॉ. संभाजी पगार, प्रा. शशी माळोदे आदी.