शनिवारी नाशिक तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने खा. हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांची भेट घेऊन नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीबाबत निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, अनेक वर्षांपूर्वी जमावबंदी आयुक्तांच्या केवळ एका पत्रामुळे शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बालाजी देवस्थानचे नाव लागलेले आहे. यामुळे लोहमार्गात जाणाऱ्या जमिनींच्या मोबदल्यातून काही रक्कम देवस्थानला देण्याचा शासनाचा विचाराधीन असलेला निर्णय शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणारा आहे. शेतकऱ्यांच्या भविष्याचा आणि पुढच्या पिढीचा विचार करून शासनाने देवस्थानला कोणताही मोबदला न देता मोबदल्याची सर्वच रक्कम शेतकऱ्यांनाच द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळात बेलतगव्हाण आणि विहितगाव येथील मोहनीष दोंदे, शरद पाळदे, सुनील धुर्जंड, ज्ञानेश्वर पाळदे, ॲड. दीपक पाळदे, ॲड. प्रतीक पाळदे, विलास धुर्जंड, सुकदेव धुर्जंड, सुरेश धुर्जंड, दीपक पागेरे, ज्ञानेश्वर पाळदे, अरुण पाळदे, आकाश पागेरे, मनोज धुर्जंड, किरण पाळदे, संजय हांडोरे, शिवाजी हांडोरे, संजय कोठुळे आदी शेतकरी उपस्थित होते.
देवस्थान जमिनींबाबत लवकरच तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:11 AM