सिन्नर : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने २३७९ कोटी रुपयांचा निधी निर्धारित केला असून, केंद्र शासनाकडे कुंभमेळ्यासाठी भरीव निधीची मागणी केली असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिन्नर येथील सभेत दिली.आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री विनायक पाटील, ह. भ. प. त्र्यंबकबाबा भगत, निवृत्ती डावरे, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ, नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, विठ्ठल उगले, राजेंद्र चव्हाणके, दिलीप शिंदे, समाजकल्याण सभापती राजेश नवाळे, विनायक सांगळे, माणिकराव बोरस्ते, रामदास खुळे, विजय काटे, राजेेंद्र घुमरे उपस्थितीत होते.पंचायत समिती व नगरपालिकेचे प्रशासकीय कार्यालय, वाहतूक बेट, नाट्यगृह व कलादालन या इमारतींचे लोकार्पण मुख्यमंत्री चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरपालिकेची २४ तास पाणीपुरवठा योजना, क्रीडा संकुल, कोटाबंधारा, देवनदी पूरकालवा, महिला बचतगटांचे मॉल या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. नाशिक जिल्हा टॅँकरमुक्त करण्याचा मनोदय मुख्यमंत्री चव्हाण यांनी बोलून दाखविला. जलसंधारणाची कामे मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा चव्हाण यांनी केली. वनतलाव बांधण्यासाठी व नवीन बंधारे बांधण्यासाठी प्रत्येकी दोन कोटी, जुने पाझर तलाव दुरुस्तीसाठी चार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले. राज्यात एकाच दिवशी तीन हजार ७८ तर नाशिक जिल्ह्यात १६२ साखळी बंधाऱ्यांचे लोकार्पण केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात केवळ १८ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असले तरी कष्टाळू शेतकऱ्यामुळे कृषी क्षेत्रातही चांगली प्रगती झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ‘गरिबी हटाव’चे इंदिरा गांधीजींचे स्वप्न आघाडी शासनाने पूर्ण केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील कोणत्याही मतदारसंघात सिन्नरइतकी विकासकामे झाली नसल्याचा दावा आमदार माणिकराव कोकाटे यांनी केला. विकासकामांबाबत कोणत्याही मंत्र्याने आपल्यासोबत स्पर्धा करावी असे खुले आव्हान कोकाटे यांनी यावेळी केले. मुख्यमंत्र्यामुळे सिन्नरला सर्वाधिक निधी मिळाल्याचे ते म्हणाले. २४ तास पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वकांक्षी पाणीयोजनेचे भूमिपूजन आपल्यासाठी न विसणारी बाब असल्याचे ते म्हणाले. बाळासाहेब वाघ यांनी आभार मानले. त्यानंतर अशोक हांडे यांचा मराठी बाणा कार्यक्रम पार पडला. (वार्ताहर)