मार्च व एप्रिल महिन्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्यामुळे रुग्णालयांमध्ये बेड कमी पडले होते. रुग्ण दाखल करण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना शक्यतो घरातच विलगीकरणात ठेवण्यात यावे, जेणेकरून गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारार्थ रुग्णालयात जागा उपलब्ध होऊन त्यांच्यावर उपचार करता येणे शक्य असल्याने शासनाने कमी लक्षणांच्या रुग्णांना घरी सोय असेल तर घरातच ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर ज्या रुग्णांसाठी घरात पुरेशी जागा, शौचालय, न्हानी घर नसेल अशांसाठी गावातील शाळांमध्ये व्यवस्था करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार मार्च व एप्रिल महिन्यात शेकडो रुग्णांना घरीच उपचारासाठी ठेवण्यात आले होते. आरोग्य विभागामार्फत अशा रुग्णांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी, मार्गदर्शन केले जात होते.
अनेक रूग्ण त्यातून बरे झाले होते. दरम्यानच्या काळात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून काेरोनाची लाट झपाट्याने ओसरू लागली असून, रूग्णालयांमध्ये देखील जागा झाली आहे. अशा परिस्थिीत पुन्हा घरात विलीगीकरणात असलेल्या रूग्णांकडून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून राज्य सरकारने घरात असलेल्या रूग्णांना कोवीड सेंटर अथवा संस्थात्मक विलीगीकरण कक्षात ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत.
नाशिक शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे साडेसात संशयित रुग्ण घरातच विलगीकरणात उपचार घेत आहेत. अशा रुग्णांची आता सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी रिकामे होत असलेले कोविड सेंटर, कोविड रुग्णालये, तसेच शाळा व महाविद्यालये, वसतिगृहांमध्ये संस्थात्मक विलगीकरणाची सोय करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मंगल कार्यालये, समाजमंदिरांचादेखील यात समावेश असून, आरोग्य खात्याच्यावतीने जागांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.