सायखेडा : नाशिक महानगरपालिकेच्या परिसरातून पकडलेले मोकाट कुत्रे ग्रामीण भागात सोडले जात असून, यातील अनेक कुत्रे पिसाळलेली असून, जनावरे, माणसे, लहान मुले यांना चावा घेत आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास नागापूर (ता. निफाड) येथील पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सात गायी जखमी झाल्या आहेत. चांदोरी येथे सहा गायी दगावल्याची घटना ताजी असतानाच नागापूर येथेही असाच प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.नागापूर येथील संपत आडके, श्रीधर बर्वे, राजू गडाख, भाऊसाहेब गडाख, समाधान गडाख, मनीषा गडाख या पाच शेतकऱ्यांच्या सात गायींना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेत जखमी केले आहे. याआधी चांदोरी येथील सागर टर्ले यांच्या तीन गायींना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने दगावल्या होत्या. या ठिकाणी सरकारी व खासगी डॉक्टरांनी गायींवर औषधोपचार केले असून, दगावण्याची भीती व्यक्त होत आहे. बिबट्यांबरोबरच भटक्या, पिसाळलेल्या कुत्र्यांची गंभीर समस्या निर्माण होत असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.गाय जोरजोराने हंबरडत होती. बघण्यास बाहेर गेलो तेव्हा चावा घेत कुत्रे अंधारात पसार झाली, आधी वासरीला जखमी करून त्यानंतर गायीला जखमी केले. औषधोपचार केले असले तरी दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबंधितांनी गंभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. - श्रीधर बर्वे, शेतकरी, नागापूर.
नागापूर येथे पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सात गायी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 7:13 PM