नाशिक : टाकळीरोडवरील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील धवलगिरी गृहनिर्माण सोसायटीच्या बंगला क्रमांक आठजवळ एक भामटा बजाज डिस्कव्हर दुचाकीने ‘कुरियर डिलिव्हरी मॅन’ म्हणून पोहचतो. बाल्कनीत बसलेल्या ८८वर्षीय आजीबार्इंना हाक मारुन खाली बोलवितो; मात्र आजीबाई वृध्दापकाळाचे कारण देत नकार देतात; तर भामटा स्वत:च्या पायाला दुखापत झाली असल्याचे सांगून वर येणे शक्य नसल्याचा संवाद साधतो. काही मिनिटांत आजीबाई खाली उतरुन येतात आणि त्यांच्याशी तो भामटा नाव, पत्ता लिहून घेण्याचा बहाणा करत त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅमची सोनसाखळी हिसकावतो; मात्र आजिबाई सावध असल्याने ते त्याचा हात धरुन ठेवतात, यावेळी भामटा हातात लागलेल्या सोनसाखळीचा भाग न सोडता जोरदार हिसका देतो आणि दुजाकीवरुन पोबारा करतो.
ही घटना भर दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास मंगळवारी (दि.१४) घडली. यानंतर आजीबाई काहिशा घाबरतात आणि तत्काळ आपल्या मुलांशी संपर्क साधून माहिती देतात. नोकरीला असलेली मुले काही वेळेत घरी पोहचतात आणि पोलिसांना घटना कळवितात. पोलीस घटनास्थळी येतात घटना विचारुन माहिती घेतात. त्यानंतर शेजारच्या बंगल्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेजदेखील सुनील कुलकर्णी (५५) यांनी पोलिसांना उपलब्ध क रुन दिले; मात्र या घटनेतील भामट्याचा अद्याप पोलिसांना थांगपत्ता तर लागलाच नाही; परंतू पोलिसांनी सात दिवसानंतर बुधवारी (दि.२२) या घटनेप्रकरणी सुनील कुलकर्णी यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करणे पसंत केले.
या घटनेतील सोनसाखळी चोर अद्याप मोकाट असल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. सुनील यांनी सुमारे चार फे-या पोलीस ठाण्याच्या लगावल्या त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतल्याचे त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा दुचाकीवरुन येताना-जाताना स्पष्टपणे दिसत आहे. तरीदेखील पोलिसांनी याप्रकरणी गांभीर्याने न घेता तपासाला गती दिली नाही. त्यामुळे अद्याप चोरटा मोकाट असून कारवाई करुन पोलीस आजीबार्इंनादेखील अद्याप दिलासा देऊ शकलेले नाही. या घटनेत पाच ग्रॅम वजनाच्या सोनसाखळीचे नुकसान झाले असून दहा हजार रुपये किंमतीचा सोनसाखळीचा काही भाग चोरटा घेऊन जाण्यास यशस्वी ठरला आहे.