नाशिक : शहरातील दुचाकी व मोबाइलचोरी घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने औरंगाबादच्या दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीच्या साडेसहा लाखांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत़ चंदन ब्रह्मदेव दुबे (२१, मूळ रा. पश्चिम दिल्ली, हल्ली बजाजनगर, औरंगाबाद) आणि मनीष भालचंद्र पाटणकर (२४, मूळ रा. अमरावती, हल्ली बजाजनगर, औरंगाबाद) अशी दोघा संशयितांची नावे आहेत़ याबरोबरच सिडकोच्या त्रिमूर्ती चौकातील संशयित राहुल दिनकर गजभिये (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली आहे़सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी सुनील जगदाळे यांना दुचाकी चोरीबाबत तर अरुण भोये यांना मोबाइल चोरीबाबत माहिती मिळाली होती़ त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना दिल्यानंतर सापळा रचून प्रारंभी दुबे व पाटणकर यांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या सहा लाख ६० हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, या दुचाकी सरकारवाडा व अन्य पोलीस ठाणे हद्दीतील चोरल्या होत्या. याबरोबरच त्रिमूर्ती चौकातील गजभिये (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) याच्याकडून एक दुचाकी जप्त केली आहे़पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ व वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए. एस. बागुल, पोलीस नाईक राजेंद्र शेळके, प्रशांत मरकड, सुरेश शेळके, प्रवीण वाघमारे, विलास देशपांडे, धनंजय शिंदे, अनिल गुंबाडे, पोलीस शिपाई अरुण भोये, सागर हजारी, अमित शिंदे, गुणवंत गायकवाड, योगेश वायकंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.अंबड परिसरातील मोबाइल चोरीमध्ये संशयित अलिशान बाबू शेख (२०, रा. महालक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ, महाकाली चौक, सिडको) आणि महेश गोरखनाथ आहिरे (१८, रा. पंडितनगर, सिडको) यांच्यासह दोन अल्पवयीनांना ताब्यात घेत पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल हस्तगत केले. दरम्यान, रोहित बाळू खंडीझोड या म्हसरूळ परिसरातील साईनगर येथील मित्तल प्लाझा येथे राहणाऱ्या संशयितांकडून देखील ७० हजार ५०० रुपये किमतीचे सात मोबाइल जप्त करण्यात आले. यामुळे वाहनचोरीचे सात, मोबाइल चोरीचे दोन असे नऊ गुन्हे उघडकीस आले आहे.
संशयितांकडून साडेसहा लाखांच्या दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 2:10 AM