नाशिक : साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने उस्मानाबादचे प्रा भास्कर चंदनशिव, कोल्हापूरचे प्रा. डाॅ. विश्वनाथ शिंदे, नांदेडचे डाॅ, मधु सावंत, पुण्याच्या कवयित्री अंजली कुळकर्णी, नागपूरचे डॉ. म. रा. जोशी, पुण्याचे कवी धनंजय सोलंकर आणि बालसाहित्यासाठी एरंडोलचे ॲड. विलास मोरे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल मंडळाच्या वर्धापनदिनी अध्यक्ष सतीश जैन यांनी सूर्योदय वाङ्मय पुरस्कारांची घोषणा केली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले, महाकवी सुधाकर गायधनी, प्रा. डाॅ. म. सु. पगारे, माया दिलीप धुप्पड, प्रा. बी. एन. चौधरी, डाॅ. संजीवकुमार सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार दिनेश दगडकर, सावळीराम तिदमे या निवड समितीने या पुरस्कारांसाठी खालील नामवंत लेखकांची निवड केलेली आहे. त्यात प्रख्यात लेखक प्रा. चंदनशिव यांना दलुभाऊ जैन मराठी साहित्यभूषण पुरस्कार, तर लेखक डॉ. शिंदे यांना पद्मश्री भवरलाल जैन स्मृती सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार यांना प्रत्येकी २१ हजार आणि मानपत्र, लेखिका डॉ. मधु सावंत यांना कांताबाई भवरलाल जैन स्मृती पुरस्कार, तर कवयित्री अंजली कुळकर्णी यांना बन्सीलाल शिवराज जैन, कांतीलाल हिरालाल चोरडिया स्मरणार्थ सूर्योदय साहित्य भूषण असे ११ हजार रुपये आणि मानपत्र हे पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर संत साहित्याचे अभ्यासक म. रा. जोशी यांना बदामबाई हेमराज देसर्डा आणि पन्नालाल भंडारी स्मृती पुरस्कार आणि कवी धनंजय सोलंकर यांना राज्यस्तरीय सूर्योदय काव्यभूषण पुरस्कार प्रत्येकी ११ हजार रुपये आणि मानपत्र देण्यात येणार आहे. ॲड. मोरे यांना लीलाबाई दलिचंद जैन हा पाच हजार रकमेचा बालसाहित्य पुरस्कार, असे राज्यस्तरीय सूर्योदय काव्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्याशिवाय गोकुळचंद लाहोटी स्मृती सूर्योदय सेवाव्रती पुरस्कार इगतपुरीतील आहुर्लीचे लेखक नवनाथ गायकर यांना दोन हजार पाचशे रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. जळगावी जानेवारी २०२२मध्ये नियोजित पहिले अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात पुरस्कार प्रदान सोहळा करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी कळविले आहे.