सिडकोतील औदूंबर बसथांबा भागात राहणाऱ्या ईश्वर भगवान वाडीले (४७) यांनी बुधवारी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ लेखानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत अंबड वजनकाट्याजवळ राहणाऱ्या सिध्दांत दीपक गायकवाड (१७) या अल्पवयीन मुलाने राहत्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास बेडरूममध्ये पंख्याच्या साहाय्याने ओढणी बांधून गळफास लावला. कुटुंबीयांनी त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी त्यास मयत घोषित केले. तिसरी घटना चुंचाळे शिवारात घडली. मोहन राजकुमार यादव (४०, रा. घरकुल योजना) यांनी बुधवारी सकाळी आपल्या राहत्या घरी हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतल्याने ते मृत्युमुखी पडले. लेखानगर येथील शॉपिंग सेंटर भागात राहणारे भूषण राजेंद्र पवार (३०, रा. खंडेराव चौक) यांनी आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये ओढणी बांधून गळफास लावून घेतल्याने कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी तपासून मयत घोषित केले. या चारही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पेठरोडवरील यजुर्वेदनगरी भागातील गौरी सोमनाथ पवार (२२) या युवतीने बुधवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट हाेऊ शकलेले नाही. सातपूर औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणारे रोशन कौतिक काळे (३१, रा. शिवनेरी बंगला) यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील स्वयंपाकगृहातील लोखंडी हुकच्या साहाय्याने साडी बांधून गळाफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पत्नी मोनाली काळे यांनी दिलेल्या खबरीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच शिंदे गावातील नायगाव रोड भागात राहणारा विशाल चंद्रभान माळी (२२) या युवकाने आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भाऊ सागर माळी यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.