नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्हा पातळीवर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये सहा तालुक्यांपुरतीच आघाडी होण्याची शक्यता आहे. उर्वरित नऊ तालुक्यांसाठी दोन्ही कॉँग्रेसमध्ये मैत्रिपूर्ण लढती होणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. मंगळवारी (दि.२४) नाशिक जिल्हा कॉँग्रेसची तातडीची बैठक कॉँग्रेस भवनात झाली. याबैठकीत नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय उमेदवारांच्या मुलाखती तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी संबंधित तालुकाध्यक्षांनी पाठविलेले अहवाल यावर चर्चा झाली. चर्चेत पंधरा पैकी सहा तालुक्यांतील अध्यक्षांनी राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत अनुकूलता दर्शविल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या सहा तालुक्यांमध्ये नांदगाव, नाशिक, निफाड, मालेगाव, सिन्नर व येवला या तालुक्यांचा समावेश आहे, तर उर्वरित कळवण, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, देवळा, चांदवड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, बागलाण या नऊ तालुक्यांत कॉँग्रेस स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत. येथील अनेक गटात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने आणि त्या तालुक्यात कॉँग्रेसची ताकद वाढल्याचा दावा संबंधित तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केल्याने या नऊही ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत मैत्रिपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. कॉँग्रेस भवनात झालेल्या बैठकीस जिल्हा प्रभारी आमदार के. सी. पाडवी, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, आमदार निर्मला गावित, माजी खासदार प्रताप वाघ, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, अॅड. अनिलकुमार अहेर, रामदास चारोस्कर, नानासाहेब बोरस्ते, जिल्हा परिषद गटनेते संपतराव सकाळे, डॉ. तुषार शेवाळे, प्रकाश शिंदे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)...तरच आघाडीजिल्ह्णातील सहा तालुकाध्यक्षांनी राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे. मात्र या सहाही तालुक्यांत कॉँग्रेसला सन्मानजनक प्रस्ताव आला तरच राष्ट्रवादी कॉँग्रेससमवेत आघाडी करण्याचा निर्णय होईल. त्याबाबत प्रदेश पातळीवर अहवाल पाठविण्यात येईल.राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष कॉँग्रेस, नाशिक
सहा तालुक्यांपुरतीच होणार ‘आघाडी’?
By admin | Published: January 25, 2017 12:25 AM