नाशिक : राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १८ एप्रिलला ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला गेलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस शनिवारी (दि.२४) नाशिकला दाखल होणार आहे. या एक्स्प्रेसमधील ७ टँकर्स हे नाशिकला उतरवले जाणार आहेत. गुरुवारी रात्री विशाखापट्टणमहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस शनिवारी सकाळी १० वाजता नाशिकरोड स्थानकात पोहोचणार आहे. या एक्स्प्रेसवरील ७ टँकर्स नाशिकमध्ये उतरवले जाणार असून, त्याबाबतचे नियोजन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यात सर्व महानगरांमध्ये करोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. रेल्वेद्वारे महाराष्ट्रासाठी रोल ऑन रोल म्हणजे रोरो पद्धतीने ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. नवी मुंबईच्या कळंबोली स्थानकातून १८ एप्रिलला रात्री ऑक्सिजन एक्स्प्रेस ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला गेली होती. आता या एक्स्प्रेसवरील ७ टँकर्समध्ये ऑक्सिजन भरण्यात आला असून, विशाखापट्टणमच्या स्टील प्लांटमध्ये ऑक्सिजनचे हे टँकर्स भरण्यात आले आहेत. ही एक्स्प्रेस विशाखापट्टणममधून रवाना झाली आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजेदरम्यान ही एक्स्प्रेस नागपुरात दाखल झाली. नाशिकला शनिवारी (दि. २४) सकाळी १० वाजता ही एक्स्प्रेस पोहोचणार आहे. या ठिकाणी ऑक्सिजन वितरणासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, राज्य शासनाच्या निर्देशानुसार ऑक्सिजन कमतरता असलेल्या ठिकाणी हे टँकर्स पोहोचवले जाणार आहेत.काही प्रमाणात दिलासादायक ठरणारनाशिकमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा असून, अनेक खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनच उपलब्ध होत नसल्याने नवीन रुग्ण दाखल करून घेणेच अनेक रुग्णालयांनी थांबवले आहे. काही रुग्णालयातून तर रुग्ण इतरत्र हलविण्यात आले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी होत असल्यामुळे तुटवडा भरून काढण्यात प्रशासनदेखील हतबल ठरू लागले आहे. अशा परिस्थितीत येणारे ऑक्सिजन टँकर हे तुटवड्याची पूर्ण पूर्तता करू शकणार नसले तरी काही प्रमाणात तरी दिलासादायक ठरू शकणार आहेत.
ऑक्सिजन एक्स्प्रेसचे सात टँकर्स आज नाशकात दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 1:15 AM
राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १८ एप्रिलला ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला गेलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस शनिवारी (दि.२४) नाशिकला दाखल होणार आहे. या एक्स्प्रेसमधील ७ टँकर्स हे नाशिकला उतरवले जाणार आहेत.
ठळक मुद्देदिलासा : नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर उतरणार साठा