नाशिक : शहरासह जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन्सची जाणवत असलेली टंचाई अद्यापही कायम आहे. त्यामुळे अजूनही इंजेक्शन मिळवण्यासाठी नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आता नाशिककरांसाठी बुधवारी (दि. १४) सात हजार रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा उपलब्ध होणार आहे.नाशिक शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून त्या तुलनेत उपचारासाठी पूरक ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन मात्र मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. गेल्या आठवड्यात तर रुग्णांच्या नातेवाइकांनी आंदोलनदेखील केले होते. त्यानंतर प्रशासनाने रुग्णालयांना थेट इंजेक्शन पुरवण्याचा निर्णय घेतला असला तरी अजूनही फार प्रभावी ठरलेला नाही अजूनही रुग्णाच्या नातेवाइकांची रेमडेसिविरसाठी पायपीट सुरूच आहे.
त्या पार्श्वभूमीवर काही पुरवठादारांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेतली होती.सोमवारीदेखील खा. गोडसे यांनी कंपनीचे नरेश हसीजा यांच्याशी त्यांनी चर्चा नाशिक जिल्हावासीयांसाठी एकूण ७ हजार रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सकाळी हा ७ हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा बंगलोर येथून एका विशेष विमानाने मुंबईत येणार असून त्यानंतर हा साठा नाशिक शहरातील अधिकृत वितरकांपर्यंत पोहोचणार आहे.