नाशिक : राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागाच्या भरारी पथकाने धुळे जिल्ह्यातील सांगवी येथे छापा टाकून ट्रकसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचे स्पिरिट जप्त केले आहे़ नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यासाठी ठिकठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत़ तसेच भरारी पथकाचे कर्मचारीही २४ तास कार्यरत आहेत़ मुंबई-आग्रा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात स्पिरिटची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळाली होती़ या माहितीनुसार नाशिक विभागाच्या भरारी पथकाने धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील सांगवी परिसरातील पार्किंग भागात सापळा लावला होता़ या पार्किंगच्या हायमास्टखाली उभ्या असलेल्या सहाचाकी ट्रकचा (एमएच १८ एए ०००२) भरारी पथकास संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता आतमध्ये नऊ प्लॅस्टिकचे ड्रम आढळून आले़ भरारी पथकाने ट्रकमधील या प्लॅस्टिक ड्रमची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे एक हजार ८०० लिटर स्पिरिट आढळून आले़ भरारी पथकाने कारवाई केल्याचे लक्षात येताच ट्रकचालक पसार झाला़ निरीक्षक एम. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश सावखेडकर, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली़
ट्रकमधून साडेसहा लाखांचे स्पिरिट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:52 AM