नाशिक : हातपंपावर पाणी भरताना धक्का लागल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून वृद्धेवर लाकडी दंडुक्याने हल्ला चढवून मारहाण केल्याने वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना २०१६ साली १० एप्रिल रोजी सुरगाणा तालुक्यात घडली होती. याप्रकरणी संशयित आरोपी चंदन महादू गाढवे (४९) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि.२६) दोषी ठरविले. गाढवे याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मयत मंजुळाबाई वाघमारे (६२, रा. हनुमंतमाळा, ता. सुरगाणा) ही वृद्ध महिला पाणी भरण्याकरिता गेली असता, त्याठिकाणी आरोपी चंदन गाढवे याने धक्का दिला. मंजुळाबाई वाघमारे हिने त्यास धक्का का दिला? असा जाब विचारला असता, आरोपी गाढवे यास राग आला व त्याने जवळील लाकडी दंडुक्याने मंजुळाबाईच्या डोक्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात मंजुळाबाई गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. याप्रकरणी त्यांचा मुलगा मधुकर वाघमारे यांच्या फिर्यादीवरून सुरगाणा पोलिसांनी संशयित आरोपी गाढवेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्णाचा खटल्याची सुनावणी नाशिक जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायधीश सूर्यकांत शिंदे यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे अॅड. शिरीष कडवे यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यात आरोपी चंदन गाढवे दोषी आढळून आल्याने त्यास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व पाचशे रु पयांचा दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास शिक्षेमध्ये सहा महिन्यांची शिक्षा सुनावली.
वृद्धेच्या खुनातील दोषीला सात वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:32 AM