येवला : विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे, तालुका पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी खामगाव पाटी, अंकाई बारी व गवंडगाव टोलनाका या ठिकाणी नाकाबंदी तसेच पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिंग आॅपरेशन केले. यात गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. यावेळी हद्दीतील रेकॉर्डवरील सर्वच गुन्हेगारांविरु द्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली. सतरा जणांना तालुकाबंदी करण्यात आली आहे.निवडणूक मतदान व मतमोजणी कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी येवला उपविभागीय दंडाधिकारी यांनी जमावबंदी आदेश जारी केले असून, रेकॉर्डवरील गैरकृत्य करणारे व हत्यारे बाळगणारे १७ गुन्हेगारांना २१ ते २४ आॅक्टोबरदरम्यान येवला शहर व तालुक्याच्या हद्दीत प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती तालुका पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी दिली. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९० व्यक्तींना निवडणूक काळात त्यांनी वागणूक चांगली ठेवून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
सतरा जणांना येवला तालुकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 1:15 AM