नाशिक : संगीत नाटकांची परंपरा पुढे नेण्याचे प्रयत्न पुणे-मुंबईत होत असतानाच सांस्कृतिक राजधानी आणि कुसुमाग्रज-कानेटकरांची कर्मभूमी असलेले नाशिकही त्यात मागे कसे राहील? व्यावसायिक रंगभूमीवर नाशिकच्याच प्राजक्त देशमुख यांची कलाकृती असलेले ‘संगीत देवबाभळी’ धूम करत असतानाच आणखी एका नाशिककराने संगीत नाटकांची ही पालखी आपल्या खांद्यावर घेतली आहे. चिन्मय मोघे उर्फ समर या अवघ्या सतरा वर्षाच्या युवकाने ‘संगीत चंद्रप्रिया’ या नाटकाची केलेली निर्मिती सध्या मराठी रंगभूमी गाजवत आहे. आपल्या नावाला साजेशी ज्ञानस्वरुप अशी कलाकृती चिन्मयने रंगभूमीवर आणतानाच त्यात नव्या नांदीसह बारा नव्या नाट्यपदांच्या माध्यमातून नाट्यसंगीतातील सकारात्मक बदलाचे दर्शन घडविले आहे.मूळ नाशिकचा असलेला चिन्मय पुण्यातील एस. पी. महाविद्यालयात सध्या बी. ए. च्या प्रथम वर्षाला आहे. नाशिकमधील आदर्श विद्यालयात दहावी तर केटीएचएममध्ये बारावी शिकलेल्या चिन्मयने लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेल्या तसेच महाराष्ट्राच्या वैभवशाली संगीत नाट्य परंपरेला पुढे नेणाऱ्या‘संगीत चंद्रप्रिया’चा यशस्वी शुभारंभ नुकताच पुणे बालगंधर्व रंगमंदिरात झाला.चिन्मय मोघे याने समर हे टोपणनाव धारण करून हे नाट्य लेखन केले आहे. कमी वयात त्याने बरेच लेखन केले असून शिवप्रताप हे मराठीतील सर्गबद्ध आणि २० वृत्तात लिहिले आहे. प्रेमगंध या कादंबरीचे लेखन पुर्ण झाले असून ‘उर्मिला’ ही कादंबरी अंतिम टप्प्यात आहे. त्याने तीन काव्य व गझल संग्रहदेखील लिहिले आहेत. मराठीत ‘चंद्रदूत’ हा दूतकाव्याचा प्रकारही त्याने नुकताच लिहून पूर्ण केला आहे. कवी ग्रेस, सुरेश भट, कुसुमाग्रज यांच्या साहित्याची त्याला विशेष आवड आहे. चिन्मय हा जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे यांचा मुलगा आहे.
सतरा वर्षांच्या चिन्मयचे ‘संगीत नाटक’ व्यावसायिक रंगभूमीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:49 AM